होमपेज › Satara › कराड बदलतंय...स्वच्छ, सुंदर होतंय...

कराड बदलतंय...स्वच्छ, सुंदर होतंय...

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 14 2018 11:39PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिभा राजे 

केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण ही मोहीम राबवण्या अगोदरपासूनच कराडमध्ये स्वच्छता अभियानास पालिकेकडून प्रारंभ करण्यात आला होता. मुख्याधिकारी यशवंत डांगे, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी स्वच्छता मोहिमेचे रणशिंग फुंकले होते. त्यात शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणाची भर पडली. त्यानंतर स्वत:च कर्मचार्‍यांना बरोबर घेवून श्रमदान करण्याचा प्रारंभ झाला आणि बघता बघता कराड शहरातील सर्व महत्वाची ठिकाणे स्वच्छ होण्यास प्रारंभ झाला. स्वच्छतेची ही जाणीव निर्माण झाल्याने आता कराड बदलतंय, स्वच्छतेची जागृती निर्माण करत शहरातील कोपरान्कोपरा आता स्वच्छ होवू लागला आहे.

केंद्र शासनाकडून सन 2016 या वर्षी देशातील प्रमुख 74 शहरांमध्ये तर सन 2017 साली 434 अमृत शहरांमध्ये स्वच्छ सर्व्हेक्षणाची मोहीम राबविण्यात आली. या दोन्ही मोहिमेच्या यशाने प्रोत्साहन मिळाल्याने जानेवारी व फेब्रुवारी 2018 मध्ये देशातील 4041 वैधानीक शहरांमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण 2018 ही मोहीम राबविण्यात येत आहे. या सर्व्हेक्षणाचा प्रमुख हेतु हा आहे कि, व्यापक स्वरुपात नागरिकांचा सहभाग वाढविण्यास उद्युक्त करणे आणि समाजाच्या सर्व स्तरातील लोकांमध्ये जागृती निर्माण करणे जेणेकरून सांघीक कार्याचे महत्व पटवून शहरातील वास्तव्य अधिक सुखकारक होईल. याशिवाय शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा पुरविण्याच्या बाबतीत शहरांमध्ये निकोप स्पर्धेची प्रेरणा निर्माण व्हावी हा देखील या मागील उद्देश आहे. 
गेल्या वर्षभरात पालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे हाती घेतली. यामध्ये यशवंत डांगे, विजय वाटेगावकर यांनी प्रथम घंटागाड्यांची संख्या 6 वरून 14  वर आणली. एकदा कचरा घंटागाडीत भरला की शहरभर कचरा सांडत जाणार्‍या घंटागाड्या दुरूस्त करून घेतल्या.  प्रत्येक गल्ली कोपर्‍यात या घंटागाड्या पोहोचतात की नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. यासाठी सकाळपासून दुपारपर्यंत सर्व गाड्यांची नोंद करण्यात आली. कचरा गोळा करून त्याचे ओला कचरा व सुका कचरा असे विलगीकरण करण्याचे महत्वाचे काम करण्यात आले. गल्लीबोळांसह बसस्थानक, बाजारपेठ याठिकाणी दिवसातून दोन वेळा स्वच्छ परिसर करण्यात आला. स्वच्छ सर्व्हेक्षणामध्ये नागरिकांचा सहभाग अत्यंत मोलाचा असल्याने लोकांना स्वच्छ सर्व्हेक्षणाचा उद्देश्य, कार्यपद्धती आणि त्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी पारंपारीक माध्यम आणि सोशल मिडीया यांचा राष्ट्रीय, राज्य व शहरांच्या स्तरावर परिणामकारक उपयोग करुन घेण्यात आला.  
सध्या शहरात सर्व बागा, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, हॉटेल,  सार्वजनिक शौचालये, वैयक्तिक शौचालये, व्यापारी पेठा आदी स्वच्छ राहण्यासाठी पालिका दक्ष राहात आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत केंद्र शासनाचे अधिकारी पाहणी करत असून शहराचे चार भाग पाडण्यात आले आहेत. त्यानुसार पाहणी करण्यात येणार आहे. 100 टक्के कचरा संकलन, 100 टक्के विलगीकरण, घंटागाडी, कचरा प्रक्रिया, हागणदारीमुक्त शहर, स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती याची पाहणी करण्यात येत आहे. स्वच्छता अ‍ॅप साठी असणारे 400 गुण पालिकेला मिळालेले आहेत. यामध्ये पहिल्या पाच रँकमध्ये कराड पोहोचले आहे. तर वेबपोर्टलवर  नागरिकांनी फॉर्म भरले आहेत. 

स्वच्छ सर्वेक्षणच्या निमित्ताने नागरिकांमध्ये स्वच्छतेची जागृती झाली. नागरिक जागरूक राहात असल्याने पालिकेचीही जबाबदारी वाढली आहे. स्वच्छतेत सातत्य ठेवणे ही महत्वाची जबाबदारी नागरिक व पालिकेची राहणार आहे. केवळ देशात नंबर मिळवण्यासाठी नव्हे तर शहर आरोग्यदायी राहण्यासाठी स्वच्छतेत सातत्य राहील, असे यशवंत डांगे यांनी सांगितले.