Mon, Apr 22, 2019 15:42होमपेज › Satara › अस्सं ‘पाटण’ सुरेख बाई..!

अस्सं ‘पाटण’ सुरेख बाई..!

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 05 2018 8:15PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

पाटण शहर अथवा विभाग पोलिस कार्यालयात वरिष्ठ अधिकारीच नसल्याने मग कर्मचार्‍यांच्या भरवशावर येथील कारभार सुरू आहे. साहेब नसल्याचा फायदा उठवत मग या महाभागांनी चिरीमिरीच्या नावाखाली पाटण शहराला अक्षरशः वार्‍यावर सोडले आहे. भर पावसात पाटणमधील रस्ते, त्यावरील पार्किंग, सम, विषम वाहतूक आणि नित्याचीच कोंडी यामुळे वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत, तर आता यात भरीत भर म्हणून कुत्री आणि गाढवांचा सततचा ‘रास्ता रोको ’ हे विद्यार्थी व महिलांच्या मुळावर उठत आहे.

वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलिस चिरीमिरीच्या मानसिकतेमधून बाहेरच पडत नसल्याने त्यांचे त्यासाठीचे  ‘अड्डे’ काही केल्या सुटेनात. यामुळे पाटणची बदनामी व दयनीय अवस्था होत असली तरी त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही. त्यामुळे अस्स ‘पाटण’ सुरेख बाई’ ची अवस्था सहन करताना गाढवं आणि कुत्रीच चोहीकडे, पोलिस मामा कोणीकडे? असे म्हणण्याची वेळ पाटणवासीयांवर आली आहे. यात आता स्वतः जिल्हा पोलिसप्रमुखांनीच लक्ष घालून वर्दीतल्या या पांढर्‍या कपड्यातील काळे उद्योग करणार्‍या वाहतूक पोलिसांना अद्दल घडवावी, अशा मागण्या जोर धरू लागल्या आहेत.