Tue, Apr 23, 2019 23:34होमपेज › Satara › कराड : मराठी फलकांसाठी शॉप इन्स्पेक्टर धारेवर(व्‍हिडिओ)

कराड : मराठी फलकांसाठी शॉप इन्स्पेक्टर धारेवर(व्‍हिडिओ)

Published On: Jan 08 2018 1:57PM | Last Updated: Jan 08 2018 1:57PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी 

इंग्रजीमधील फलक न हटवल्याने आठ दिवसांची मुदत देत मनसे पदाधिकाऱ्यांनी कराडचे शॉप इन्स्पेक्टर अनिल पाटील यांना सोमवारी अक्षरश: धारेवर धरले. त्यानंतर इंग्रजी फलक लावलेल्या दुकानदारांना मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनिल पाटील यांनी समज देत कारवाईचे संकेत दिले आहेत.

महिनाभरापूर्वी हात जोडून विनंती केली होती. मात्र, त्यावेळी असलेल्या अधिकाऱ्यांची बदली होऊन आता पुन्हा नवीन अधिकारी म्हणून तुम्ही पदभार स्वीकारला आहात. त्यामुळे आता आम्ही आठ दिवसांची मुदत देत दुकानांवरील इंग्रजी फलक हटवण्यासाठी हात जोडून विनंती करत आहोत. आठ दिवसांनी हेच हात सोडून मनसे स्टाईल आंदोलन करू, असा गर्भित इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, मलकापूरचे माजी नगरसेवक दादा शिंगण, नितीन महाडीक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दिला.

तत्पूर्वी, आम्ही मराठी फलकांचा कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत अनेकदा आंदोलने केली आहेत. गेल्या महिन्यातही लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते. त्यानंतरही कोणतीच ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याबाबत संताप व्यक्त करत मनसे पदाधिकाऱ्यांनी अनिल पाटील यांना त्यांच्याच कार्यालयात अक्षरश: धारेवर धरले होते.