Fri, Nov 16, 2018 17:07



होमपेज › Satara › ठिय्या आंदोलनादरम्यान शांतता अबाधित ठेवू 

ठिय्या आंदोलनादरम्यान शांतता अबाधित ठेवू 

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 08 2018 1:51AM



सातारा : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी दि. 9 ऑगस्टच्या क्रांतीदिनी सातारा जिल्ह्यात होत असलेले ठिय्या आंदोलन शांततेच्या मार्गाने करून सातारा जिल्ह्याची शांतता  व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती व  जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या संयुक्‍त बैठकीत घेण्यात आला.     

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती व जिल्हा प्रशासन यांची संयुक्‍त बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, अतिरिक्‍त जिल्हा पोलिस प्रमुख विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट, सातारा शहरचे पोनि सारंगकर यांची उपस्थिती होती. 

मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासाठी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रभर  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आंदोलन पर्व सुरू आहे. दि. 9 ऑगस्ट रोजी सर्वत्र महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात 10 तालुक्यांमध्ये त्या त्या तहसील कार्यालयासमोर 11 ते 3 या वेळेत ठिय्या आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे तर सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने सातारा शहर व तालुक्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मराठा बांधव ठिय्या देवून बसतील त्याचवेळी पाच भगिनी पोवईनाका येथे जावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील.

ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यानंतर पाच भगिनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतील. दुपारी 3 वाजता ठिय्या आंदोलनाची सांगता होईल. या व्यतिरिक्‍त मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने दुसर्‍या कोणत्याही स्वरूपाचे आंदोलन केले जाणार नाही. आंदोलनामध्ये काही हिंसक प्रवृत्ती घुसण्याची शक्यता लक्षात पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा. यापूर्वी सातार्‍यात झालेली घटना लक्षात घेवून पोलिसांनी अशा प्रवृत्तींवर वॉच ठेवावा. असे प्रकार करणार्‍यांचा मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीशी संबंध असणार नाही, असेही यावेळी समन्वय समितीच्यावतीने बैठकीत जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आले. 

सातार्‍यात गेल्या काही आठवड्यांपूर्वी झालेला हिंसक प्रकार लक्षात घेता व सर्वसामान्यांना त्याचा त्रास होवू नये आणि निरपराधांना झळ  सोसावी लागू नये यासाठी समन्वय समितीच्यावतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्याचवेळी सातार्‍यात यापूर्वी झालेल्या प्रकारात जे निरपराध आहे त्यांच्यावरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत. निरपराधांना विनाकारण गोवले जावू नये, अशी मागणीही समन्वय समितीच्यावतीने प्रशासनाकडे करण्यात आली. 

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी महाराष्ट्र शासन मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गंभीर असून सध्या एकमेव त्याच विषयावर काम सुरू आहे. मराठा बांधवांच्या पदरात निश्‍चित काहीतरी पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा विचार करून आंदोलन हे शांततेच्याच मार्गाने केले जावे. आरक्षणाची मागणी  मान्य व्हायची आणि ज्यांना लाभ होईल त्यांच्यावर अगोदरच गुन्हे दाखल असायचे. मग त्याचा लाभ त्यांना कसा मिळेल? असे घडू नये म्हणून आता शांततेचा मार्ग स्वीकारा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले. 

समन्वय समितीने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सातार्‍यातले आंदोलन शांततेने होईल. मात्र, जर या आंदोलनात घुसून कुणी गैरप्रकार केला तर किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केला तर त्या संबंधितावर कारवाई करावी लागेल, असेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.  

त्याचवेळी मराठा समाजासाठी महाराष्ट्र शासनाने ज्या योजना लागू केल्या आहेत त्यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या पातळीवर सातत्याने बैठका आयोजित केल्या जातील व त्याची माहिती समन्वयकांना दिली जाईल, असेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. 

आंदोलन शांततेत करा : खा. उदयनराजे-आ. शिवेंद्रराजे 

समन्वय समितीच्या बैठकीला खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांचे समन्वय समितीमध्ये समर्थकही उपस्थित होते. त्यांनी नेत्यांच्या वतीने भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्हीही आग्रही आहोत. यासाठी होत असलेले आंदोलन लोकांना त्रासदायक होऊ नये म्हणून 9 तारखेचे आंदोलन शांततेत करा, असे आवाहन खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांनीही केले आहे.