Tue, Jul 16, 2019 09:52होमपेज › Satara › फलटण : विजेचा धक्‍का लागून २ वारकऱ्यांचा मृत्‍यू  

फलटण : विजेचा धक्‍का लागून २ वारकऱ्यांचा मृत्‍यू  

Published On: Jul 16 2018 10:31AM | Last Updated: Jul 16 2018 10:31AMफलटण (जि. सातारा) : प्रतिनिधी 

तरडगाव ते फलटण मार्गावर माऊलींचा सोहळा येत असताना तीन भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या घटनेला काही तास उलटत नाहीत तोपर्यंत फलटण येथील पालखी तळावर तीन भाविकांना विजेचा धक्‍का लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन भाविक ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये ज्ञानोबा माधवराव चोपडे (वय 65 रा.समतापूर ता. जि. परभणी) आणि जाईबाई महादू जामके (वय 60 रा.शिवणी पो.सुनेगाव ता.लोहा जि. नांदेड) अशी ठार झालेल्‍या वारकऱ्यांची नावे आहेत तर, कमलाबाई गोविंद लोखंडे (वय 65 रा.सासफळ ता.पूर्णा जि. परभणी ) असे जखमी वारकऱ्याचे नाव आहे. 

 याबाबत मिळालेली माहिती अशी, फलटण पालखी तळावरील पालापासून विद्युत वाहक तार गेली होती. सोमवारी पहाटे 4.15 च्या सुमारास तीन वारकऱ्यांना ही तार न दिसल्याने त्यांना या विद्युत वाहक तारेचा शॉक बसला. यात ज्ञानोबा चोपडे आणि जाईबाई जामके यांचा जागीच मृत्‍यू झाला तर, कमलाबाई लोखंडे या जखमी झाल्‍या त्‍यांना उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, आपल्या घरापासून लांब अंतरावर विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात यामध्ये अनेकदा वारकऱ्यांचा मृत्यू होतो. अशा लोकांना आळंदी देवस्थान व महाराष्ट्र शासनाच्या वतीने मदत करावी अशी मागणी वरकाऱ्यांमधून होत आहे.