Mon, Jun 24, 2019 21:36होमपेज › Satara › होम मिनीस्टरमध्ये बक्षिसांच्या वर्षावात कस्तुरी चिंब

होम मिनीस्टरमध्ये बक्षिसांच्या वर्षावात कस्तुरी चिंब

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 11:53PMसातारा : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब-च्यावतीने आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात कोमल अनपट या पैठणीच्या मानकरी ठरल्या. उपविजेत्या संगीता शिंदे यांनी चांदीचा करंडा पटकावला. यावेळी घेण्यात आलेल्या  वेशभूषा स्पर्धेसही महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विजेत्यांवर बक्षीसांचा वर्षाव झाला. जिल्ह्यातील यशस्वी  गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याने हा कार्यक्रम आणखी उंचीवर नेवून ठेवला. 

 दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब  व गिरीषा वेल्थ मेकर यांच्या संयुक्त विद्यमाने  सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये   होममिनीस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील दहावी - बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा  सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात  आला. यावेळी गिरीषा वेल्थ मेकरचे शंकरराव करपे, दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्त संपादक हरीष पाटणे, वसीम डांगे, महेश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी घेण्यात आलेल्या विविध वेषभूषा स्पर्धेत धनश्री बागडे व सायली पाटील या विजेत्या ठरल्या. या स्पर्धेत सहभागी महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मराठी टीव्ही मालिकेची थीम या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली होती. मालिकेतील ज्या पात्राची वेशभूषा केली होती त्या पात्राची छटा या महिलांच्या वागण्या-बोलण्यात  दिसत होती. अनेकींनी तर आपल्या आवडत्या पात्रांचे डायलॉग बोलून  उपस्थितांची मने जिंकली.  विजेत्या महिलांसह सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक बक्षीसे देण्यात आली. तसेच  लकी ड्रॉमध्ये भाग्यवान विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सहप्रायोजक  गिरीषा वेल्थ मेकर प्रा. लि.चे शंकरराव कर्पे  हे होते. त्यांनी  महिलांना पैशांची योग्य गुंतवणूक आणि भविष्याचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. या संस्थेकडून  लोकांचा आर्थिकस्तर व गुंतवणूक याबाबतची जागरुकता वाढवण्याचे कार्य केले जाते. भविष्यातील पैशाचे योग्य नियोजन कसे करावे, जवळच्या पैशांवर आणखी पैसे कसे कमवावेत यावरही मार्गदर्शन केले जाते. त्याबरोबर शेअर्स बाजार प्रशिक्षण, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, करन्सी, कमोडिटी, आयपीओ, बँक एफ.डी., लोन, बॉन्डस् इत्यादी प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी मिळण्याचे ठिकाण म्हणून गिरीषा वेल्थ मेकरकडे पाहिले जाते. सातारा, कराड, कोल्हापूर, पुणे, मुंबई तसेच राज्याबाहेरही संस्थेचे कार्यक्षेत्र आहे.

प्रास्तविकात बोलताना दै. ‘पुढारी’चे वृत्त संपादक हरीष पाटणे म्हणाले,  दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब हे  महिलांच्या सुप्त कलागुणांना व्यक्त करण्यासाठी  उत्तम व्यासपीठ असून महिलांनी त्याचा लाभ घ्यावा. कस्तुरी क्लबच्यावतीने  महिलांसाठी वेळोवेळी अनेक चांगले उपक्रम  राबवले जात असून महिलांचा त्याला चांगला  प्रतिसाद लाभत आहे. 

 कार्यक्रमाच्या विविध स्पर्धेत  अ‍ॅड. वर्षा पाटील व डॉ. किशोरी कोद्रे  यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कस्तुरी क्लबच्या कोऑर्डिनेटर तेजस्विनी बोराटे यांनी आभार मानले.