Thu, Jun 27, 2019 17:54होमपेज › Satara › राम नामाच्या गजरात श्रींच्या समाधीवर पुष्पवृष्टी 

राम नामाच्या गजरात श्रींच्या समाधीवर पुष्पवृष्टी 

Published On: Dec 13 2017 2:04AM | Last Updated: Dec 12 2017 10:46PM

बुकमार्क करा

दहिवडी : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र गोंदवले येथे श्री ब्रह्मचैतन्य समाधी मंदिर परिसरात मंगळवारी पहाटे सुमारे सव्वा लाखांवर भाविक जमले होते. श्रींच्या समाधीची पूजा झाल्यावर रवींद्र पाठक यांचे प्रवचन झाले. यानंतर निर्वाणीचा जो अभंग ब्रह्मचैतन्य महाराजांनी केला होता, तोच सादर करण्यात आला आणि श्रीराम श्रीराम गजर  झाला. बरोबर 5.55 वाजता श्रींच्या समाधीवर भाविकांनी पुष्पवृष्ठी केली व श्रींची आरती झाली. 

श्रींच्या 104 व्या पुण्यतिथी महोत्सवाचा आज गुलालाचा मुख्य दिवस होता. काल रात्रभर भाविक प्रवास करून गोंदवले नगरीत पोहचत होते. रात्रभर श्रींचे मुखदर्शन सुरू होते.त्यानंतर पहाटे काकडा, भूपाळ्या झाल्या. त्यानंतर प्रसाद मंडपात श्रींच्या जीवनातील माहिती सांगणारे रवींद्र पाठक यांचे कीर्तन झाले. त्यानंतर राम नामाचा गजर झाला व श्रीं च्या समाधीवर गुलाल फुले वाहण्यात आली.हा सोहळा सर्व भाविकांना वेगवेगळ्या ठिकाणी लाईव्ह पाहता यावा यासाठी ठीकठिकाणी स्क्रीन लावण्यात आले होते. त्यामुळे भाविकांची मोठी सोय झाली. भाविक वेगवेगळ्या ठिकाणी विभागले गेल्याने मुख्य मंडपातील गर्दी विभागली गेली.

सकाळच्या थंडीतही भाविक मोठ्या श्रद्धेने गोंदवले नगरीत उपस्थित होते. गोंदवले ग्रामपंचायतीने पार्किंगची प्रत्येक रस्त्यावर सोय केल्याने भाविकांना वेळेत पोहचता आले.सरपंच अंगराज कट्टे व त्यांच्या सहकार्‍यांनी उत्सव काळात खूप मेहनत घेतली. सकाळी 7 वाजता पंचपदी भजन झाल्यावर 8 वाजता प्रथेप्रमाणे नगर प्रदक्षिणा करून रामदासी भिक्षा मागण्यात आली. यावेळी सर्व विश्‍वस्त उपस्थित होते. त्यानंतर पालखीची नगर प्रदक्षिणा झाली. उत्सव काळात दररोज पालखीच्या पुढे पाटांच्या पायघड्या घातल्या गेल्या.

समाधीस्थळी  राम नाम जपाची सांगता करण्यात आली. गेल्या वर्षीचा एकूण 213 कोटी 83 लाख 83 हजार एवढा जप नोंदला गेला.उद्या एकादशी निमित्ताने  हभप रामदास आचार्य यांचे समाधी मंदिरात सकाळी 10 वाजता लळीताचे कीर्तन होणार आहे तर द्वादशीला काल्याचे कीर्तन होवून उत्सवाची सांगता होणार आहे. राम नाम व अन्नदान ही श्रीं ची शिकवण असून प्रथेप्रमाणे उत्सवात दुपारी व रात्री दररोज हजारोंच्या संख्येने लोकांनी प्रसाद घेतला.श्रीं च्या मंदिरात वर्षभर दररोज येथे दुपारी व रात्री मोफत अन्नदान केले जाते. श्रीं ची ही शिकवण आजही गोंदवले नगरीत टिकून आहे.