Fri, May 29, 2020 19:39होमपेज › Satara › ‘कृष्णा’च्या विद्यमान संचालकांकडून मुस्कटदाबी 

‘कृष्णा’च्या विद्यमान संचालकांकडून मुस्कटदाबी 

Published On: Sep 20 2019 1:45AM | Last Updated: Sep 19 2019 8:10PM
कराड : प्रतिनिधी

संस्थापक पॅनेलची कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर सत्ता असताना वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी सभासदांना खुला प्रवेश देण्यात येत होता. विरोधकांना व्यासपीठावर बसायला दिले जात होते. बोलण्याची संधी दिली जात होती. विद्यमान संचालक मंडळाने सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करून दोन हजार पेक्षा जास्त सभासदांना सभेच्या ठिकाणी प्रवेश दिला गेला नाही. ही मुस्कटदाबी आहे, असा आरोप माजी चेअरमन व विद्यमान संचालक अविनाश मोहिते यांनी केला आहे. याबाबचे निवेदन त्यांनी प्रसिध्दीस दिले आहे. 

दरम्यान, ज्या सभासदांना अक्रियाशील ठरविण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. त्या कारखान्याने मागे घ्याव्यात तरच या प्रकरणात विश्‍वास ठेवता येईल असेही मोहिते यांनी पत्रकात म्हटले आहे.  संस्थापक पॅनेल मधून निवडून आलेले संचालक प्रवेश पत्रिका घेऊन सभेला उपस्थित राहण्यासाठी आले होते. तरीही आम्हाला विद्यमान संचालक मंडळाने प्रवेश नाकारला. आम्ही सभात्याग केला. खरेतर आम्ही विचारलेल्या सोळा प्रश्‍नांची उत्तरे आम्हाला हवी होती. ऊस देऊनही केवळ सभेला अनुपस्थित राहिले म्हणून कोणाला अक्रियाशील करू नये, अशी मागणी होती. नोटीसा पाठविण्यात आलेल्या 3 हजार 720 सभासदांबाबत त्यांनी केलेला खुलासा लबाडीचा आहे. ऊस आणायचा नाही आणि वरून त्यांना अक्रियाशील ठरवून त्यांचा मताचा अधिकार काढून घ्यायचा हा त्यांचा डाव आहे. सभेच्या व्यासपीठावरून अध्यक्षांनी आपल्या ज्या प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत, ती लेखी स्वरूपात द्यावीत.

वर्ष उलटून गेले तरी गेल्या वर्षीच्या ऊस बिलातील 50 रूपये आज तागायत दिलेले नाहीत. चालू वर्षीच्या एफआरपी अधिकचे 200 रूपये का दिले नाहीत, या प्रश्‍नाला त्यांनी थातूरमातूर उत्तर दिली आहेत. जून 2015 मधील कामगारांना पंधरा दिवसांचा पगार दिलेला नाही. तसेच वेतन वाढ करारातील फरकाची रक्‍कम कधी देणार, या प्रश्‍नाचे उत्तर दिले नाही. 

संस्थापक पॅनलची सत्ता असताना आम्ही कारखान्याकडे असणारी सभासदांची ठेव परत दिली होती. उरलेल्या 32 ते 33 कोटी रूपयांच्या ठेवी कधी परत देणार असा प्रश्‍न होता. पण अध्यक्षांनी संस्थापक पॅनेलने त्यांच्या कार्यकाळात ठेवच परत दिली नसल्याचे धडधडीत खोटे सांगितले. त्यांनी सर्व ठेवी लवकर परत द्याव्यात, डिस्टीलरीचे उत्पादन अन्य कारखान्यापेक्षा कमी दराने विकली जात असल्याचे स्पष्ट असताना अध्यक्षांनी आपला दर इतरांपेक्षा जादा असल्याची थाप मारली आहे. संस्थापक पॅनलच्या काळात गेटकेनचा ऊस पूर्णपणे बंद करण्यात आला होता. ते गेटकेन यांनी सुरू केले आहे. 

व्यासपीठावरून अतुल भोसले यांनीही लहान तोंडी मोठा घास घेतला आहे. माझ्यावर वैयक्तीक टीका करताना त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या केसवर भाष्य केले आहे. मी दोन वेळा कारखान्याच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आलो आहे. दोन वेळा विधानसभा आणि एक वेळ कारखान्याची निवडणूक हरलेल्यांनी जनमताबद्दल बोलू नये, असा इशाराही अविनाश मोहिते यांनी डॉ. भोसले यांना दिला.