होमपेज › Satara › पर्यटकांच्या गर्दीने नंदनवन ‘बहरले’

पर्यटकांच्या गर्दीने नंदनवन ‘बहरले’

Published On: May 28 2018 1:33AM | Last Updated: May 28 2018 12:02AMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरु असल्याने महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्‍वर सध्या पर्यटकांच्या गर्दीने फुलले आहे. 
महाराष्ट्रासह सर्वत्र उन्हाळ्याची काहिली जाणवत असली तरी थंड हवेचे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये मात्र सायंकाळी धुक्याचे साम्राज्य पहावयास मिळत असून पर्यटक थंडीचा अनुभव घेत आहेत. मुख्य बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून सर्वच प्रेक्षणीय स्थळे गर्दीने हाऊसफुल्ल झाली आहेत.वातावरणातील बदलाचा पर्यटक आनंद लुटत असून सर्व पॉईंटवर  पर्यटकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.  

देशाच्या कानाकोपर्‍यातून सध्या या पर्यटनस्थळी पर्यटक गर्दी करीत आहेत. येथील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांसोबतच निसर्गाची विविध रूपे पाहण्यात पर्यटक मश्गुल आहेत. या पर्यटनस्थळी विविध राज्यांमधून विशेषत: गुजरात राज्यामधून येणार्‍या पर्यटकांची संख्या येथे अधिक असून सध्या येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेले वेण्णालेक,प्रसिद्ध ऑर्थरसीट पॉईंट, श्री क्षेत्र महाबळेश्‍वरसह सूर्योदयासाठी प्रसिद्ध असलेला विल्सन पॉईंट, सुर्यास्तासाठीचा प्रसिद्ध मुंबई पॉईन्ट, लॉडविक पॉईंट, केट्स पॉईंट या मुख्य प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांनी गर्दी आहे. काही हौशी पर्यटक कॅनॉट पीक, प्लेटो सारख्या हिरवाईने नटलेल्या पर्यटनस्थळांवर वेळ घालविताना दिसत आहेत. 

प्रसिद्ध वेण्णालेकची पाणी पातळी घटली असली तरी पर्यटक नौकाविहाराचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संखेने गर्दी करत आहेत. यंदा प्रथमच  पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेटची सोय करण्यात आली आहे. रोइंगसह पँडल बोटसाठी तिकिट केंद्रांवर पर्यटकांची मोठी रांग लागल्याचे चित्र आहे.  वेण्णालेकला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून येथील मका कणीस,फ्रँकी, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम खाताना पर्यटक आनंदी होत आहेत. हौशी पर्यटक घोडेसवारी करताना पहावयास मिळत आहेत. यामध्ये बच्चे कंपनीचा सहभाग आहे. 

मुख्य बाजारपेठा पर्यटकांनी गजबजून गेल्या आहेत. येथील गरमागरम चना, शेंगदाणे, जाम, चिक्की, फज सोबतच येथील प्रसिद्ध चप्पलच्या दुकानावर पर्यटक मोठी गर्दी करताना दिसत आहेत. 
 ऑर्थरसीट,केट्स पॉईंटसारख्या पर्यटनस्थळांचे रस्ते छोटे असल्याने वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना काही पर्यटनस्थळांवर करावा लागत आहे.त्यातच केट्स पॉईंटकडून श्री क्षेत्र महाबळेश्‍वरकडे जाणारा डचेस रस्त्याचे काम पालिकेच्या वतीने सुरु करण्यात न आल्याने ऐन हंगामात देखील पर्यटकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे.

शनिवारी ऐन गर्दीच्या वेळी वेण्णालेक येथे शिवशाही बस रस्त्याच्यालगत  बंद पडल्याने वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. वाहतूक कोंडी सोडवताना पोलीसांची मात्र चांगलीच दमछाक झाली.