Tue, Apr 23, 2019 06:34होमपेज › Satara › ट्रक चालकाला मारहाण करणार्‍या पोलिसाची जमावाकडून धुलाई

ट्रक चालकाला मारहाण करणार्‍या पोलिसाची जमावाकडून धुलाई

Published On: Dec 03 2017 1:03AM | Last Updated: Dec 02 2017 11:02PM

बुकमार्क करा

पिंपोडे : वार्ताहर 

सातारा-लोणंद रस्त्यावर पळशी फाट्याजवळ गाडी आडवी मारल्याच्या कारणावरून  पोलिसाने ट्रक चालकास रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. त्यामुळे ही घटना पाहणारा जमाव संतप्त होऊन त्याने फलटण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या या पोलिसाचीच धुलाई केली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चालक सुजित बनकर आपला ट्रक (क्र. एम एच 09 सीयू 4662) घेऊन निघाला होता. पाठीमागून येणारा पोलिस शिंदे याने सातारा - लोणंद रस्त्यावरील पळशी फाटा येथील दोस्ती धाब्याजवळ ट्रकच्या पुढे जाऊन तो थांबवला. चालकाला गाडीबाहेर बोलावून पोलिसांना गाडी आडवी मारतो काय? म्हणून दरडावत मारहाण केली. 

कमरेचा पट्टा काढून ट्रकचालकास बेदम मारले. त्यामुळे बनकर हे रक्तबंबाळ होऊन त्यांच्या डोक्याला इजा झाली. हा प्रकार येणा-जाणारे पाहत होते. ट्रकचालकाला पोलिसी खाक्या दाखवत अमानुषपणे मारहाण झाल्याने घटना पाहणारा जमाव संतप्त झाला होता. त्यामुळे या जमावाने मारहाण करणार्‍या पोलिसाला चांगलाच चोप दिला. 

दरम्यान, कोरेगाव येथे कामानिमित्त गेलेल्या वाठार स्टेशन पोलिसांनी येताना हा प्रकार पाहिला व जमावाला शांत करून ट्रकचालक व पोलिस दोघांनाही वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात आणले. ट्रकचालक व पोलिस दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार स्टेशन येथे पाठविले होते.

घटनेची माहिती मिळताच कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी वाठार पोलिस ठाण्यास भेट दिली. ट्रकचालक सुजित बनकर याने संबंधित पोलिस हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप केला आहे. रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी तक्रारी देण्याचे काम सुरू होते. अधिक तपास स.पो.नि. मयूर वैरागकर करीत आहेत.