Sun, May 19, 2019 22:01होमपेज › Satara › साताऱ्यात अडीच हजार आंदोलकांवर दंगलीचा गुन्हा

साताऱ्यात अडीच हजार आंदोलकांवर दंगलीचा गुन्हा

Published On: Jul 26 2018 3:10PM | Last Updated: Jul 26 2018 3:10PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनानंतर महामार्ग रोखून जाळपोळ, तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अडीच हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दंगल घडवणे, खूनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानीची कलमे लावून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे.  

निखिलेश मस्के, सुरज निगडे, उदयजित कांबळे, सचिन माने, संभाजी गंभीर, किरण जाधव (सर्व रा.सातारा शहर परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, यांच्यासह अल्पवयीन युवकांचाही समावेश आहे. 

दरम्यान, बुधवारी रात्रीपासून दंगलीत समावेश असणार्‍यांची नावे समोर येत असून त्यामध्ये मंगेश जगताप, संजय पवार, मंगेश ढाणे, मल्लेश मुलगे, सचिन कोळपे, सचिन खोपडे, महेश माने, जीवन राउते, निकेत पाटणकर, संदीप नवघणे, सचिन कदम, समीर शेख, लक्ष्मण खरडे (सर्व रा.सातारा शहर परिसर व तालुका) यांचा समावेश आहे. गुन्ह्यात निष्पन्न झालेल्यांची नावे आणखी वाढणार असून त्यांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी फौजदार नानासाहेब कदम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बुधवारी सकल मराठा समाजाचा हजारो बांधवांच्या उपस्थितीत मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन शांततेत पार पडले. दुपारी बारानंतर मात्र, अचानक महामार्ग रोखण्यावरुन हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाचे हे लोण एवढे आक्रमक बनले की अचानक विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील सर्व भाग, नटराज मंदिर परिसरात आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत सातारा जिल्हा पोलिस दलातील अधिकार्‍यांसह तब्बल 32 कर्मचारी जखमी झाले आहेत. दुपारी तीन नंतर अखेर पोलिसांनी दगडफेक करणार्‍या जमावाला काबू करण्यास सुरुवात करुन धरपकड मोहीम राबविली.

रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी सुमारे ७० जणांना ताब्यात घेतले होते. संबंधितांची चौकशी केली असता गुरुवारी सकाळपर्यंत 10 जणांचा दंगलीत प्रत्यक्ष सहभाग आढळला. याशिवाय पोलिसांनी केलेले, शुटींग फोटो याची खातरजमा केली असता त्यातून आणखी अनेकांची नावे समोर आली असून यामध्ये सुमारे अडीच हजार जणांचा समावेश असल्याचे पोलिसांचे तक्रारीत म्हणणे आहे.