होमपेज › Satara › मतदार नोंदणी अधिकार्‍यांवर गुन्हे  दाखल करण्याची कार्यवाही सुरू

मतदार नोंदणी अधिकार्‍यांवर गुन्हे  दाखल करण्याची कार्यवाही सुरू

Published On: Jun 08 2018 1:24AM | Last Updated: Jun 07 2018 11:22PMकराड : प्रतिनिधी

मतदार नोंदणी कार्यक्रमात हलगर्जीपणा करणार्‍या मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्या अनुषंंगाने अकरा अधिकार्‍यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली.

मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या अनुषंगाने गुरुवारी हिम्मत खराडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस तहसीलदार राजेंद्र शेळके, निवडणूक नायब तहसीलदार बजरंग चौगुले यासह सर्व मंडलअधिकारी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोग मुंबई यांच्यामार्फत पुनरिक्षण कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत घरोघरी भेट देऊन 1 जानेवारी 2018 रोजी पात्र असलेले परंतु मतदार म्हणून अद्याप नोंदणी न झालेल्या नागरिकांची नावे गोळा करणे, 1 जानेवारी 2019 रोजी मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र ठरणार्‍या भावी मतदारांची नावे गोळा करणे, दुबार, मयत व कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदारांची माहिती गोळा करणे, मतदार यादीतील नोंदणीची दुरूस्ती करणे आदी कामे 20 जून पर्यंत मतदार केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी घरोघरी भेट देऊन करावयची आहेत. तथापि मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून क्षेत्रीय स्तरावर अद्याप कोणत्याही प्रकारचे काम झालेले नसल्याने संबंधित अधिकार्‍यांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 चे कलम 32 नुसार गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणूक कार्यालयाकडून 11 मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांना नोटीसा बजावण्यात आल्या असून संबंधितांवर गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत.