Thu, Apr 25, 2019 23:32होमपेज › Satara › मिठी मारून रेल्वेखाली प्रेमी युगुलाची आत्महत्या

मिठी मारून रेल्वेखाली प्रेमी युगुलाची आत्महत्या

Published On: Feb 01 2018 3:47PM | Last Updated: Feb 01 2018 10:23PMसातारा / शिवथर : प्रतिनिधी

बसापाचीवाडी ता.सातारा  येथील प्रेमीयुगुलाने एकमेकांना मिठी मारुन रेल्वेखाली आत्महत्या केली. शिवथर हद्दीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. अनिल चव्हाण (वय 28) व पूजा शिंदे (वय 17) अशी या युगुलाची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, अनिल व पूजा या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. बुधवारी ते दोघेही दुचाकीवरुन शिवथर गावच्या हद्दीतील रेल्वे ट्रॅकवर गेले होते. पहाटेच्या सुमारास दोघेही एकमेकांना मिठी मारुन रेल्वे रुळावर झोपले. याच दरम्यान आलेल्या रेल्वेने दोघांना सुमारे 200 मीटर अंतरापर्यंत फरफटत व चिरडत नेले. त्यांचे शरीर छिन्‍न विछन्‍न झाले.

परिसरातील रेल्वे गेटच्या वॉचमनला रेल्वे ट्रॅकलगत दोन मृतदेह निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. रेल्वे पोलिस व सातारा तालुका पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर प्रथम दोघांची ओळख पटवण्यात आली. अनिल हा सध्या सातारा येथे एका वाहनाच्या शोरुममध्ये कामाला होता तर पूजा दहावीमध्ये शिकत होती. धक्‍कादायक बाब म्हणजे अनिल याचा विवाह झाला आहे. पुढील तपास पोनि प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दिपक बर्गे करत आहेत.

बुधवारी रात्रीच झाले पसार...

अनिल व पूजा या दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी प्लॅन केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण झोपले असतानाच हे दोघेही (क्र. एमएच 11 बीझेड 2083) या दुचाकीवरुन गावातून बाहेर पडले. दोघांनी शिवथर - पाडळी रस्त्यावरील रेल्वेरुळ गाठला. शिवथर गावच्या हद्दीतील रेल्वे गेट नंबर 8 वर दोघेही एकमेकांना मिठी मारुन रुळावरच झोपी गेले. पहाटेच्या सुमारास रेल्वे आल्यानंतर त्याखाली चिरडून गेले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दीड वर्षांपूर्वी अनिलचा झालाय विवाह..

अनिल चव्हाण याचा सुमारे दीड वर्षांपूर्वी विवाह झाला असल्याची माहिती समोर आली असून त्याची पत्नी गर्भवती आहे. अनिल व पूजाचे प्रेमसंबंध असल्याने ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. त्यातूनच दोघांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असल्याची परिसरात चर्चा आहे.