Fri, Apr 19, 2019 08:31होमपेज › Satara › कराडात तोतया पोलिस गजाआड

कराडात तोतया पोलिस गजाआड

Published On: May 29 2018 1:30AM | Last Updated: May 29 2018 12:22AMकराड : प्रतिनिधी 

पोलिस गणवेश परिधान करत सहायक पोलिस निरीक्षक असल्याची बतावणी करणार्‍या वडगाव हवेली (ता. कराड, सातारा) येथील नीलेश सुरेश चव्हाण (वय 26) या तोतया पोलिस अधिकार्‍यास कराड शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. सातारा शहरासह कराड, सांगली, पाचवड भागांत त्याचा वावर होता. त्यामुळेच त्याने कोणाची फसवणूक तर केली नाही ना? याचा कराड पोलिस शोध घेत आहेत. 

नीलेश चव्हाण हा सोमवारी दुपारी कराडमधील कोल्हापूर नाका परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यानजीक उभा होता. त्यावेळी पोलिस ड्रेस परिधान केलेला चव्हाण काही लोकांना आपण पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करत होता. याबाबतची माहिती कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक हणमंत गायकवाड यांना समजली. त्यानंतर त्यांनी तानाजी शिंदे व प्रफुल्ल गाडे या दोघा पोलिस कर्मचार्‍यांना त्वरित कोल्हापूर नाका परिसरात पाठवले.

यावेळी शिंदे व गाडे यांनी चव्हाणकडे विचारणा केली असता तो गडबडला. त्यानंतर त्वरित त्याला ताब्यात घेत कराड शहर पोलिस आणण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सायंकाळपर्यंत कराड शहर पोलिस ठाण्यात सुरू होती.

दरम्यान, संशयित तोतया पोलिस चव्हाण हा सातारा शहर, कराड शहर, सांगली जिल्ह्याच्या विविध भागात पोलिस अधिकारी म्हणून फिरत होता, अशी धक्‍कादायक माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. पोलिस गणवेश घालून फिरणे आपणास आवडत होते, असे चव्हाण पोलिसांना सांगत आहे. त्याने काही लोकांनाकडून पैसे उकळल्याचीही माहिती समोर येत असून पोलिस या माहितीची शहनिशा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत करत होते.