Wed, Mar 20, 2019 02:36होमपेज › Satara › दीपक हजारे यांचे नगरसेवक पद रद्द 

दीपक हजारे यांचे नगरसेवक पद रद्द 

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 04 2018 11:07PMवाई : प्रतिनिधी

जात पडताळणीत प्रमाणपत्र अवैध ठरल्याने वाई पालिकेतील सत्तारूढ तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसवेक दीपक सुधाकर हजारे यांचे नगरसेवक पद अपात्र ठरवण्यात आले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी गुरुवारी दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला धक्‍का बसला असून पालिकेतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.   पालिकेच्या 2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत तीर्थक्षेत्र विकास आघाडीने 21 पैकी 14 जागांवर बहुमत मिळवले होते. भाजपच्या नगराध्यक्षा आणि सहा सदस्य वाई विकास महाआघाडीचे असे पक्षीय बलाबल आहे. दोन स्वीकृत नगरसेवक तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आहेत. 

पालिकेच्या या निवडणुकीत प्रभाग क्र. 5अ या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागेवर दीपक हजारे निवडून आले. त्यावेळी दि. 28 ऑक्टोबर 2016 रोजी नामनिर्देशन पत्र सादर करताना त्यांनी राजपूत भामटा, ही जात नागरिकांच्या मागास प्रवर्गात येत असल्याचा दावा केला होता. त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडील जात प्रमाणपत्र सादर केले होते. निवडणुकीनंतर सहा महिन्यांत जात पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यानुसार दिपक हजारे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत विभागीय जात पडताळणी अधिकारी, कोल्हापूर यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.

दरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा जिल्हा सचिव यांनी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर राजपूत भामटा या जातीचा समावेश नागरिकांच्या मागास प्रवर्गात सिध्द होत नसल्याने हजारे यांचा दावा अमान्य करून सदर उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले असल्याचे कळविले होते. त्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मुख्याधिकारी वाई यांच्याकडे पुढील कारवाई करण्यासाठी तसा अहवाल दिला होता. त्यावर मुख्याधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवून जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने आपले नगरसेवक पद रद्द का करण्यात येवू नये? असे दिपक हजारे यांना कळवले. त्यावर हजारे यांनी जात प्रमाणपत्र समितीच्या निर्णयाविरूध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी हा आदेश काढला असल्याचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले. पालिकेच्या प्रभाग 5 अ मधील दिपक हजारे यांचे नगरसेवक पद अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या पदासाठी येत्या दीड महिन्यात पोटनिवडणूक होणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.          

Tags : Satara, corporator, termination, cancelled