Wed, Sep 26, 2018 10:14



होमपेज › Satara › संशयितांना बाजारपेठेतून नेले चालवत

संशयितांना बाजारपेठेतून नेले चालवत

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:33PM

बुकमार्क करा





कराड : प्रतिनिधी

ड्युटीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या सहायक फौजदारासह हवालदारास धक्काबुक्की करत मारहाण केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांच्या मुलासह आणखी एकास पोलिसांनी अटक केली. त्यांना सोमवारी (दि. 4 रोजी) सकाळी न्यायालयासमोर हजर केले असता, एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान, पोलिस जीप नादुरुस्त झाल्याने पोलिसांना मारहाण करणार्‍या दोघा संशयितांना पोलिसांनी मुख्य बाजारपेठेतून न्यायालयापर्यंत व तेथून पुन्हा पोलिस ठाण्यापर्यंत चालवत नेले. 

सईद अल्ताफ शिकलगार (रा. मंडई, गुरुवार पेठ, कराड) व इंद्रजित ऊर्फ टुन्या यशवंत भिंताडे (वय 25, रा. रविवार पेठ, कराड) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी दत्त चौक परिसरात ड्युटीवर असलेल्या वाहतूक शाखेचे सहायक फौजदार बळवंत चव्हाण व हवालदार उमेश बाजीराव माने यांना मारहाण केली होती. याची उमेश माने यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

शहर वाहतूक शाखेचे सहायक फौजदार बळवंत चव्हाण व हवालदार उमेश  माने हे दोघे जण रविवारी दत्त चौक ते कर्मवीर पुतळा परिसरात वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत होते. त्याच वेळी सईद  शिकलगार याच्यासह आणखी दोघे मोटारसायकलवरून ट्रिपल सिट तेथे आले. त्यांना पोलिसांना अडविले असता मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला एक जण उतरून पळून गेला. तर इतर दोघांना पोलिसांनी अडविले. त्यावेळी त्यांनी पोलिसांनाच आरेरावीची भाषा करून धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी सईद शिकलगार याला पकडून शहर पोलिस ठाण्यात आणले.

तर इंद्रजित भिंताडे तेथून पळून गेला होता. त्याचा पोलिस शोध घेत होते. त्याला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिपीका जौंजाळ करत आहेत. 

दरम्यान, पोलिस जीप नादुरूस्त झाल्याने दोन्ही संशयितांना पोलिसांनी न्यायालयापर्यंत मुख्य रस्त्यानी बाजारपेठेतून चालवत नेले व तेथून पुन्हा शहर पोलिस ठाण्यापर्यंत चालवतच आणले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी जमली होती.