कराड : प्रतिनिधी
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसने सुरू केलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी कराडमध्ये प्रतीकात्मक दहीहंडी फोडली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी कराडमध्ये सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रतीकात्मक दहीहंडी फोडली. केंद्र सरकार व राज्य शासन यांच्या पापाचा घडा भरला आहे आणि तो आम्ही आज फोडला, असा दावा करत काँग्रेस नेत्यांनी यावेळी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा सोमवारी दुसरा दिवस होता. सकाळी दहाच्या सुमारास काँग्रेस नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीकडे अभिवादन करण्यासाठी रवाना झाले. त्यावेळी कोल्हापूर नाका परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक दहीहंडीचे आयोजन केले होते. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवत सरकारच्या पापाचा घडा भरल्याचा फलक लावत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सकाळी दहाच्या सुमारास खासदार अशोक चव्हाण, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्यासह राज्यभरातील आमदार काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राज्य व केंद्र सरकार अपयशी ठरले असून जनता त्यांना घालवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही सरकारच्या पापाचा घडा भरला आहे. आम्ही तो आज फोडत आहोत, असा इशारा खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिला आहे.