Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Satara › अल्पवयीनकडून खुनाची कबुली

अल्पवयीनकडून खुनाची कबुली

Published On: Jul 14 2018 12:57AM | Last Updated: Jul 13 2018 9:02PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील अर्क शाळा परिसरात गुरुवारी सकाळी तडीपारीत असलेला गुंड कैलास नथू गायकवाड (वय 25, रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी 24 तासांच्या आत एका अल्पवयीन मुलाला पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा नामदेववाडी झोपडपट्टीत याच घटनेतून काही महिलांमध्ये वादावादी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले  होते.

कैलास गायकवाड याचा खून झाल्यानंतर त्याबाबत तक्रार त्याचे वडील नथू गायकवाड यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अर्कशाळा हा वर्दळीचा परिसर आहे. गुरुवारी सकाळी कैलास गायकवाड या तडीपार युवकाचा मृतदेह अर्कशाळेजवळ सापडल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कैलास गायकवाडच्या चेहर्‍यावर गंभीर वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाला होता. तडीपार गुंडाचा खून झाल्याने पोलिसही हादरुन गेले होते. त्यातच कुटुंबियांनी संशयित आरोपीला पकडल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार असल्याचा पवित्रा घेतल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते. अखेर गुरुवारी दुपारी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे गतीमान करुन पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून तपासाला व चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली. जुन्या भांडणाच्या कारणातून हा खून केला असल्याचे समोर आले आहे.

गुरुवार सकाळपासून पोलिसांसमोर या घटनेचे आव्हान निर्माण झाले असतानाच शुक्रवारी दुपारी नामदेववाडी झोपडपट्टीमध्ये याच खुनाच्या कारणातून महिलांमध्ये वादावादी झाली. वादावादी होत असतानाच हाणामारीला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा तणावाचे वातावरण झाले. शाहूपुरी पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे चार पोलिस व्हॅन घटनास्थळी पोहचल्यानंतर जमाव पांगला. घटनेच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून सायंकाळी उशीरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, डीवायएसपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि किशोर धुमाळ, पोलिस हवालदार आतिष घाडगे, शिंदे, हसन तडवी, विश्‍वनाथ मेचकर, बाजीराव घाडगे, जयराम पवार, बालम मुल्‍ला, दिपक कारळे, अतुला तावरे, किरण यादव, श्रीनिवास देशमुख, धोंडिराम हंकारे, स्वप्नील कुंभार, प्रिती माने, पंकजा जाधव, दिपाली पवार, गिरीष रेड्डी, तुषार पांढरपट्टे, जयवंत बुधावले, विशाल मोरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.