Sat, Apr 20, 2019 17:52होमपेज › Satara › कम्युनिस्ट विचारांचे साक्षीदार धोंडीराम नांगरे-पाटील यांचे निधन 

कम्युनिस्ट विचारांचे साक्षीदार धोंडीराम नांगरे-पाटील यांचे निधन 

Published On: Dec 30 2017 12:09PM | Last Updated: Dec 30 2017 12:06PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी 

जेष्ठ विचारवंत, स्व. यशवंतराव मोहिते यांचे सहकारी व कम्युनिस्ट विचारसरणीचे साक्षीदार जखीणवाडीचे पहिले सरपंच धोंडीराम दाजी नांगरे-पाटील (वय ९८) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. जखिणवाडीचे आदर्श सरपंच नरेंद्र नांगरे - पाटील यांचे ते वडील होत.

धोंडीराम नांगरे - पाटील यांनी स्व. यशवंतराव मोहीते यांच्या सोबत कम्युनिस्ट विचारसरणीतून शेतकरी कामगार पक्ष व नंतर कॉंग्रेस पक्षात खांद्याला खांदा लावून काम केले. मोहिते घराण्याचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी शेवटपर्यंत एकनिष्ठा जपली. स्वातंत्र्यानंतर १९६२ साली स्थापन झालेल्या जखिणवाडी ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच म्हणून १० वर्षे कारभार केला. याच कालावधीत  १९६२ ते  १९७२ या कालखंडात ते भूविकास बँकेचे अध्यक्षही होते. याशिवाय कृष्णा उद्योग समूहात विविध पदावर त्‍यांनी काम केले. त्यांना कृष्णा कारखान्यात स्विकृत संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 

त्यानंतर कराड तालुका खरेदी विक्री संघ , सागरेश्वर सहकारी सुतगिरणी यासारख्या संस्थेत विविध पदांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांनी जखिणवाडी गावाचा सर्वांगिण विकास करण्यात मोलाचा वाटा उचलला. बाहेर काम करत असताना गावाकडे दुर्लक्ष होऊ नये, म्हणून बंधू रामराव नांगरे - पाटील यांच्यासह गावातील सहकार्यांना अनेक वर्षे सरपंचपदावर काम करण्याची संधी दिली. तर आयुष्याच्या उत्तरार्धात मुलगा नरेंद्रला गाव कारभारात मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच बदलावा जखिनवाडीचा चेहरामोहरा बदलण्यात नरेंद्र नांगरे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी यशस्वी झाले.  याच कामाची दखल घेत नरेंद्र पाटील  यांचा ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्याचबरोबर बंधू रामराव नांगरे - पाटील यांच्या सहकार्याने अधुनिक शेती करून परिसरातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा आदर्श घालून दिला. अशा या कम्युनिस्ट विचारसरणीच्या साक्षीदार असलेल्या धोंडीराम पाटील यांची शुक्रवार, 29 डिसेंबरला सकाळी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पाश्चात  भाऊ , दोन मुले , सहा मुली , सुना नातवंडे आसा परिवार आहे.  धोडींराम नांगरे - पाटील यांचा रक्षाविसर्जन विधी शनिवार, 31 डिसेंबरला सकाळी 10 वाजता जखिणवाडी येथे होणार आहे.