Fri, Aug 23, 2019 14:56होमपेज › Satara › रंगात रंगुनी तरूणाई चिंब  

रंगात रंगुनी तरूणाई चिंब  

Published On: Mar 06 2018 7:54PM | Last Updated: Mar 06 2018 7:53PMसातारा : प्रतिनिधी

विविध रंगांची उधळण करणार्‍या रंगपंचमीची मंगळवारी सातार्‍यात चांगलीच धूम पहायला मिळाली. बालगोपाळांसह अवघी तरूणाई विविध रंगात अक्षरश: चिंब भिजून निघाली. शहरातील चौकाचौकात, गल्लोगल्ली व कॉलनीमध्ये रंगाच्या या उत्सवाला उधाण आले होते. सातार्‍यासह जिल्ह्यात सर्वत्र रंगपंचमी उत्साहात व जल्लोषात साजरी झाली. 

रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव. त्यानिमित्ताने मंगळवारी सातारा शहरातील अवघे जनजीवन रंगमय होऊन गेले.  लाल, पिवळा, निळा, हिरवा अशा नानाविध रंगात चिंब भिजलेल्या बालगोपाळांसह तरूणाईने अक्षरश: मनमानीपणे रंगोत्सव साजरा केला. काहींनी तर ऑयलपेंडच्या रंगानी अनेकांचे चेहरे माखवून टाकले. शहरातील गल्लोगल्ली लहान मुलांसह युवकांच्या झुंडी एकमेकांच्या अंगावर रंग उडवत  होते.  15 ते 20 च्या जणांचा समुह एकमेकांना रंगांनी भिजवताना उत्साहात न्हावून गेल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले.  

नोकरीनिमित्त दुसर्‍या ठिकाणी ये-जा करणारांनाही नाक्या-नाक्यावर व चौका-चौकातील युवकांचे टोळके टार्गेट करुन रंग शिंपत असल्याने अनेकांना कपडे बदलून कामावर जावे लागले. काही लोकांची रंगपंचमीमुळे गैरसोय झाली असली तरी उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली.