होमपेज › Satara › ‘सेल्फी’ अंतरंगाचा

‘सेल्फी’ अंतरंगाचा

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 27 2018 8:31AMसतीश मोरे

1990 सालची गोष्ट. अकरावी-बारावीला सद‍्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये शिक्षण सुरु होते. सगळे मित्र ग्रामीण भागातून आलेले. स्टाईल मारणारे काहीजण होते. एक दोघे दुचाकी वाहने घेऊन यायचे. पण बहुतांशी जण सायकल आणायचे. टिबल सीट सायकल जोरात चालवणे,  हात सोडून सायकल चालवणे, ही आमची स्टाईल. आम्ही बाहेर गावावरून येणारे कृष्णा कॅनॉल वर उतरायचो, तेथून चालत कॉलेजमध्ये! कराड शहरातील पोरं तशी आमच्या कॉलेजात कमीच. कारण एसजीएम  म्हणजे डाऊन मार्केट, खेड्यातल्या पोरांचे कॉलेज. 

कॉलेज म्हणजे आमचं विश्‍व होतं. कॉलेजात एक कॅन्टीन होतं,  पण तिथं आम्ही कमी जायचो. बाहेर एक चहाचं खोकं होते. तिथं आम्ही मित्र चहा प्यायला जात होतो.  खिशात  पाच दहा रूपये  असायचे. पण ते असणं पण मोठ्ठं होते. कधी कधी पैज लागायची, हरेल त्याने चहा क्रिमरोल द्यायचा. काय सांगू त्या चहा आणि क्रिमरोलला कसली भन्नाट टेस्ट यायची! चांगले मित्र होते, टीचर तर एकदम बेस्ट. आम्ही अ‍ॅडमिशन घेतले. तेव्हापासूनच शिक्षकांची ओळख, कोणते विषय ठेवायचे ते तेच सांगायचे. सर आणि विद्यार्थी याच्यामध्ये आदराचे नाते होते, घरी येणेजाणे व्हायचे. खेड्यातल्या पोरांना शिकवायला खेड्यातून आलेले शिक्षकच होते. आमचा मित्र परिवार वाढत होता कारण बोलण्याचा स्वभाव आणि ओळख काढण्याचा नाद! अशातूनच मित्राचा मित्र असलेला एक नवीन मित्र  तयार झाला, विटा भागातला होता. त्याचे पुर्ण नाव आठवत नाही, पण निकम फक्त आठवतंय. तो मिलिटरी होस्टेल मध्ये रहायचा.  

एकदा दुपारी मी त्याच्या सोबत तिकडे गेलो होतो. आत प्रवेश केला, समोर मोठ्ठा  आरसा होता. आठरावं वरीस आणि समोर आरसा दिसल्यावर काय होतं, हे सर्वश्रुत आहे. हे वय असं असतं की सारखं आरशात बघून मी कसा दिसतो,  हे पाहण्याची उत्सुकता असते. थोडं मिसरूड फुटलेलं,  त्यामुळे मोठ्ठा झालो, असे वाटू लागते. सारखा कंगवा आणि आरसा. तोंड धुवायचे, पावडर लावायची, भांग पाडायचा, हे   कॉलेजकुमाराचे आवडते काम. मिलिटरी होस्टेल मधील तो आरसा पाहून खिशात हात घातला, कंगवा काढला आणि स्टाईल मध्ये भांग पाडू लागलो.  तेवढ्यात सिक्युरिटी गार्डचा आवाज आला,  कॉलेजकुमार, जरा  दमानं,  आरसा फुटंल. भांग पाडा आणि मग आरशावर काय लिहलंय ते ही वाचा! त्याने दम भरला. इतक्या वेळ फक्त आरशात बघत होतो, आता आरशाकडे पाहीले, वरच्या बाजूला सुंदर अक्षरात लिहिले होते, ‘तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा तुम्ही कसे आहात याचा विचार करा!’ थोडं डोकं हललं. विचार केला, विचार करण्याचं वय होते ते. एक छोटं वाक्य होतं ते. पण अर्थ खूप मोठा होता. सुंदर दिसण्यासाठी सगळेच आटापिटा करतात,  पण आतून सुंदर दिसावे, खुलावे,आंतरिक सौंदर्य वाढवावे, यासाठी कोण प्रयत्न करते का?  

आज हे आठवायचे कारण म्हणजे आजकाल वाढलेले सेल्फीचे वेड. माझा मुलगा अठरा वर्षाचा आहे, तोपण सारखा सेल्फी काढत  असतो. त्याला पाहून मला मिलिटरी होस्टेल वरचा तो आरसा डोळ्यासमोर उभा राहिला. सध्या  बहुतेक जणांकडे  मोबाईल आहे.  पाच ते बारा पिक्सल कॅमेरा त्यामध्ये आहे. दिवसभर एक सेल्फी काढत नाही , असा कॉलेजकुमार आढळणे अवघड आहे. काढला सेल्फी, टाकला ग्रुपवर. मित्रमंडळीना केला शेअर फेसबुकवर, व्हॉटस अपवर, हाईकवर ! इतके फोटो काढतात, शेअर करतात, पण कुणीतरी मी कसा दिसतो त्यापेक्षा मी कसा आहे, हा विचार केला आहे का? त्यांना  असा विचार करा म्हणून सांगणारे भेटतात का ?दिवसभर काय काय केलं ? कुणाकुणाला किती वेळा रागवलो ? कुणाचे मन दुखावले ? कुणावर ओरडलो ? कुणाकुणाला आनंद दिला ? किती गोष्टी मनासारख्या केल्या?  किती मनापासून केल्या? मनाविरुद्ध केल्या? कोणाकोणाच्या चेह-यावर हसू आणले ? याचा  विचार करणे, त्या टिपणे म्हणजे अंतरंगाचा सेल्फी.! आपण हा सेल्फी टिपतो का ?

थोर तत्त्ववेत्ते रॉबीन सिंग म्हणतात, आपण रोज किमान एकातरी अनोळखी व्यक्ती कडे पाहून हसले पाहिजे. अनोळखी व्यक्तीकडे पाहून हसल्यावर वेगळा आनंद मिळतो. आपण आपल्या ओळखीच्या व्यक्ती कडे तरी बघून हसतो का कधी? खोटं हास्य आणून सेल्फी काढतो तेव्हा आपणास आनंद मिळतो का? मिळाला तर तो आनंद किती काळ टिकतो?  स्वतः आनंदी होण्यासाठी दुसराही आनंदी असायला हवा, असा आपण का विचार करत नाही.   स्वतःचा चेहरा जपतो, मग विचार का जपत नाही? सेल्फी म्हणजे आपलं प्रतिबिंब आहे आपले खरे रूप नव्हे. आपलं खरं रूप, अंतरंग असून ते आपल्या इतकं कुणालाही माहीत नाही. आपण आपल्या अंर्तमनाला विचारले तर आपल्या इतके वाईट कोणी नाही , मी हे चुकीचे केले आहे, असं करायला नको होतं, हे आपल्या लक्षात येईल. संत कबीर म्हणतात,  

बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय
जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न कोई  !

सेल्फी हे आपले अंतरंग व्हायला हवे. आपल्या चेहर्‍याकडे पहिल्यावर आपल्याला आनंद झाला पाहिजे. चेहर्‍याच्या सेल्फी पेक्षा अंतरंगाचा आनंद महत्वाचा.