Mon, Mar 25, 2019 09:09होमपेज › Satara › सातार्‍यात ‘मेरीट’ अन् ‘डोनेशन’चा बोलबाला

सातार्‍यात ‘मेरीट’ अन् ‘डोनेशन’चा बोलबाला

Published On: Jun 30 2018 1:20AM | Last Updated: Jun 29 2018 10:43PMसातारा : योगेश चौगुले

‘नेमीची येतो पावसाळा’ त्याप्रमाणेच ‘प्रतिवर्षी होतो शैक्षणिक प्रवेशाचा मेळा’....या वर्षीही हा मेळा भरलेला आहे. लहान गटांपासून महाविद्यालयीन व उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रवेशासाठी पाल्य व पालक धडपडत आहेत.  ‘मेरीट’आणि ‘डोनेशन’ हे शब्द जोरात घुमू लागले आहेत. या स्पर्धेत प्रवेश निश्‍चित होणार का? या चिंतेने पालक - पाल्यांची धाकधुक वाढली आहे.

शिक्षणातील स्पर्धा प्रचंड जीवघेणी झाली आहे. पूर्वी पदवीधर होणे, हिच उच्च शिक्षणाची व्याख्या होती. पण, अलिकडील वीस वर्षात शिक्षण आणि नोकरी यांच्या कक्षा रुंदावल्या आहेत. अभियांत्रिकी, मेडिकल, स्पर्धा परीक्षा या क्षेत्राकडे जाण्यासाठी पाल्य व पालकांची स्पर्धा लागली आहे. शासकीय नोकर्‍यांचे प्रमाण कमी होऊन खासगी क्षेत्राचा विस्तार वेगाने झाला आहे. या क्षेत्रात टिकण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण घेण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु आहे. त्यासाठी लहान गटापासूनच मुलांची तयारी करुन घेण्यासाठी पालकांमध्ये शर्यत सुरु आहे.

पूर्वीची बालवाडी संकल्पना संपुष्टात येवून लहान गट, मोठा गट आणि सहा वर्षानंतर पहिलीचा प्रवेश अशी वाट सुरु झाली आहे. प्राथमिक शिक्षण हा पुढील संपूर्ण शिक्षणाचा पाया आहे. या पायावरच उच्च शिक्षण व करिअरची इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे गुणवतापूर्ण शिक्षण देणार्‍या शाळांकडे पालक - पाल्यांचा कल वाढला आहे. सातारासह जिल्ह्यात अलिकडील काळात शैक्षणिक सजगता वाढली आहे. त्यातून अनुदानित व विनाअनुदानित खासगी शाळांचा भाव वाढला आहे. आणि जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. 

सध्या सर्वत्रच इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची क्रेझ आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये वाढ होत चालली आहे. मात्र, काही शाळा सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण देतात. अनेक पालक पहिल्यापासूनच पाल्यांना अशा शाळेत प्रवेश घेत आहेत तर मराठी माध्यमातील शाळांकडेही मोठ्या प्रमाणात ओघ सुरु आहे.  त्यामुळे येथेही ‘मेरीट’ आणि ‘डोनेशन’ हा शब्द घुमत आहे. प्राथमिक ते माध्यमिक हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर दहावी नंतरची दिशा निश्‍चित करण्यासाठीही पालक व पाल्यांची धावपळ सुरु आहे. 70 टक्के पुढील विद्यार्थी - विद्यार्थीनी विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी आग्रही आहेत. अनेक महाविद्यालये, विद्यापीठ व अन्य नियंत्रण घटकांच्या नियमानुसार मेरिट लिस्ट ची चाळण लावून अंतिम यादी करीत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत लहान गटापासून पुढील सर्व शिक्षण प्रवेशात मेरीट, डोनेशन याचा मेळ घालून पालक मार्ग काढत आहेत. शैक्षणिक प्रवेशाने शाळा व महाविद्यालयांचे आवार फुलून गेले आहे. 

अभियांत्रिकीकडील ओढा कमी

दोन वर्षात अनेक विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकिकडे कल कमी झाला आहे. मेडीकल आणि स्पर्धा परीक्षा यांबरोबर व्यावसायीक शिक्षणाकडे विद्यार्थी वळले आहेत. तसेच सर्वत्र स्पर्धा परीक्षेची जागृती वाढीस लागली आहे. शहरासह मोठ्या गावांत स्पर्धा परीक्षा केंद्रेही वाढली आहेत. शिक्षणात काही होकारार्थी घडत असताना काही बाबतीत ‘मार्केटिंग’चा फंडाही वाढला आहे.

पालक व विद्यार्थ्यांत संभ्रमावस्था

शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश फीमध्ये 50 टक्के सुट दिल्याचे बोलले जाते. मात्र, त्याची अंमलबजावणी कुठेच झाल्याची दिसत नाही. काही दिवसापूर्वी सोशल मिडीयावर फीमधील सवलतीचा एक अर्ज व्हायरल झाला होता. तो प्रवेशा दरम्यान भरुन सादर केल्यास मराठा समाजाच्या विद्यार्थ्यास फीमध्ये सुट मिळेल, अशा आशयाचा मजकूर होता. मात्र याची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने प्रवेशा दरम्यान पालक व विद्यार्थ्यांच्यात संभ्रमावस्था आहे.