Sat, Jul 20, 2019 23:33होमपेज › Satara › जिल्हाधिकारी कार्यालयात भामट्यांकडून फसवणूक

जिल्हाधिकारी कार्यालयात भामट्यांकडून फसवणूक

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 10:25PMसातारा : प्रतिनिधी

शासकीय सेवेत नोकरी लावतो, असे सांगून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात ऑर्डर देण्यासाठी बोलावून घेतलेल्या महिलेचे 1 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या सुमारे 5 तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांवर भामट्यांनी डल्‍ला मारला असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून ही घटना सोमवारी दुपारी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासन व केसरी दिवाही संशयितांनी वापरला असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

प्राजक्‍ता मनोज पाटील (वय 25, रा.केसे पो.वारुंजी ता.कराड) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. याप्रकरणी प्रशांत मोरे व अनोळखी चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित प्रशांत मोरे याचे पाटील कुटुंबियांना पोस्टकार्ड पत्र आल्याने त्यांची ओळख झाली होती. ओळखीदरम्यान आपण नाशिक येथे अधीक्षक असल्याचे सांगून गरजूंना आपण शासकीय नोकरी लावतो, असेही त्याने सांगितले. यातूनच पाटील कुटुंबियांनी त्यांना नोकरी लावण्याची विनंती केल्यानंतर दि. 7 जानेवारी रोजी संशयित कारमधून तक्रारदार यांच्या गावी भेटायला गेला होता. त्यावेळी त्याच्या कारमध्ये महाराष्ट्र शासन व केसरी दिवा होता. त्याठिकाणी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर उत्तरपत्रिका असल्याचा कागद दाखवून त्यावर तक्रारदार प्राजक्‍ता पाटील यांची सही घेतली. संशयित प्रशांत मोरे याने ती सही उत्तरपत्रिकेवर घेतल्याचे सांगून लवकरच मेरीट लिस्ट लावून तुमचे काम करतो, असे सांगितले. फोनवरुन त्याने काम झाल्याचे सांगून दि. 22 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यास सांगितले.तक्रारदार आल्यानंतर त्यावेळी प्रशांत मोरे याच्यासह  त्याचे  इतर चार अनोळखी साथीदार होते. तक्रारदार यांना बोलावून कागदपत्रांची त्यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून गेल्यानंतर त्यांना बाजूला घेेवून अंगावरील दागिने अधिकार्‍यांना आवडणार नसल्याचे सांगून ते काढण्यास सांगितले. तक्रारदार प्राजक्‍ता पाटील यांनी ते दागिने काढून संशयितांच्या हातात दिले. यावेळी अधिकार्‍यांच्या भेटीची वेळ मागून येतो, असे सांगून संशयित तेथून निघून गेले.

सुमारे एक तासानंतरही कोणी आले नसल्याचे पाहून तक्रारदार यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. नोकरी देणारे कोणीच नसल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार समोर  आला व त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.