Tue, Nov 20, 2018 01:09होमपेज › Satara › सलग दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर गारठले

सलग दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर गारठले

Published On: Mar 24 2018 1:00PM | Last Updated: Mar 24 2018 1:00PMमहाबळेश्वर : वार्ताहर

थंड हवेचे ठिकाण असणारे महाबळेश्वर उन्हाळ्यात देखील थंडीचा अनुभव देत आहे. काल शुक्रवारप्रमाणे आज (शनिवार दि.२४) देखील महाबळेश्वरचा पारा पुन्हा एकदा घसरला. वेण्णालेकसह लिंगमळा परिसरामध्ये पुन्हा एकदा हिमकण जमा झाल्याचे पाहावयास मिळाले.

महाबळेश्वरमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कमालीचा वाढला आहे. शनिवारी पहाटे देखील वेण्णालेकसह लिंगमळा या परिसरात दवबिंदूचे रूपांतर हिमकणात झाल्याचे दृश्य पुन्हा एकदा पाहावयास मिळाले. चक्क मार्च महिन्यामध्ये थंडीने उच्चांक गाठला असून एकीकडे महाराष्ट्र उन्हाने होरपळून निघाला असताना, महाबळेश्वर जणू थंडीत हरवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

थंडीचा आनंद घेण्यासाठी व हिमकण पाहण्यासाठी पर्यटक या थंड हवेच्या पर्यटनस्थळी गर्दी करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढत चालले असून वेण्णालेक परिसर लिंगमळा भागात मोठ्या प्रमाणावर थंडीचा कडाका जाणवत आहे. वेण्णालेक व लिंगमळा परिसरातील घरांवर, झाडांवरील पानाफुलांवर, चारचाकीच्या टपांवर हिमकण जमा झाले होते, हिरवळीवर तर हिमकणांचा गालिचाच पसरला होता.