होमपेज › Satara › महाराष्ट्रदिनी कराड पालिकेची रायगडावर स्वच्छता मोहीम

महाराष्ट्रदिनी कराड पालिकेची रायगडावर स्वच्छता मोहीम

Published On: May 05 2018 12:53AM | Last Updated: May 04 2018 9:09PMकराड : प्रतिनीधी

रायगड संवर्धनाच्या कामात  स्वच्छता अभियानच्या माध्यमातून कराड नगरपालिकेचा  हातभार लागला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कराड नगरपालिकेने  रायगडावर स्वच्छता मोहीम राबवली. यात सुमारे 14 पोती कचरा गोळा झाला.छत्रपती शिवाजी महाराज समाधी  आणि जगदिश्‍वर मंदिर परिसरात भर उन्हात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.  यात गोळा केलेला 14 पोती कचरा गडाच्या पायथ्याशी पाचाड गांवी आणण्यात आला. मुख्याधिकारी यशवंत डांगे  यांच्यासह पालिकेचे 20 कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. 

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मुख्याधिकारी डांगे  हे त्यांच्या मित्रांसोबत रायगडला गेले होते. त्यावेळी समाधी परिसरात फिरताना तिथे असणारा  कचरा पाहून त्यांनी गडावर स्वच्छता मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला.  त्यानुसार काल कर्मचार्‍यांची सुट्टी लक्षात घेवुन रायगड स्वच्छतेचा बेत आखण्यात आला.  काल सकाळी डांगे व कर्मचारी  रायगडाला रवाना झाले. सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज व जगदिश्वर मंदीरात दर्शन घेऊन स्वच्छता मोहिमेला सुरूवात झाली. यात बाटल्या, वेफर्स ची रिकामी पाकिटे, तुटलेली चपला आदी कचरा गोळा करण्यात आला.  परिसरात विखुरलेला सुमारे 14 पोती कचरा गोळा झाला. त्यामुळे संपूर्ण परिसर चकाकून गेला. यावेळी कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. काही कर्मचारी पहिल्यांदाच आले होते. मुख्याधिकारी डांगे यांच्या पुढाकाराने कर्मचार्‍यांची झालेली सहल व स्वच्छता मोहीम यामुळे कर्मचार्‍यांतही आनंदाचे वातावरण आहे.

Tags : Satara, cleaning, Raigad Fort, occasion,  Maharashtra Day