Sat, Jun 06, 2020 09:23होमपेज › Satara › दहावी विद्यार्थ्यांची शनिवारपासून कलचाचणी

दहावी विद्यार्थ्यांची शनिवारपासून कलचाचणी

Published On: Feb 08 2018 1:54AM | Last Updated: Feb 07 2018 11:05PMसातारा : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील 44 हजार 830  विद्यार्थ्यांची 10 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत शिक्षण विभागाकडून मानसशास्त्रीय कलचाचणी होणार असून त्याद्वारे 10 वीतील  विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखेकडे आहे? हे समजून त्यांना करिअर निवडणे सुकर होणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावर व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम प्रभावीपणे करण्यासाठी दहावीनंतर  शिक्षणाच्यादृष्टीने सोयीस्कर निर्णय घेता यावा यासाठी विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय  कलचाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कल  विचारात घेवून त्यांच्या आवडीनुसार  आणि क्षमतेनुसार योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होणार आहे.  तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देता येणार आहे.  सद्यस्थितीत अनेक ठिकाणी शिक्षक समुपदेकांमार्फत  करिअर मार्गदर्शन केले जात असले तरी अशा शिक्षकांची व हे मार्गदर्शन घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने अतिशय कमी आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्यावतीने  नव्या धोरणातून जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना या कल चाचणीचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जिल्ह्यातील सुमारे 44 हजार  830 विद्यार्थ्यांची   दि.  10 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत कलचाचणी घेण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील  सुमारे 647  शाळा असून यामध्ये अनुदानित 526, अंशत: अनुदानित 30 विदाअनुदानित 27, कायम विनाअनुदानित 64 या शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांमधील 10 वीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी  होणार आहे. दहावी परीक्षेनंतर या कसोट्यांवर आधारित सल्ला विद्यार्थ्यांना एप्रिल व मे महिन्यात शिक्षण मंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन दिला जाणार आहे. 10 वी परीक्षेच्या निकालावेळी कलचाचणीचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.