Mon, Aug 19, 2019 18:38होमपेज › Satara › चितळी प्रा. शाळा धोकादायक

चितळी प्रा. शाळा धोकादायक

Published On: Dec 20 2017 1:44AM | Last Updated: Dec 19 2017 11:18PM

बुकमार्क करा

मायणी : वार्ताहर

चितळी, ता. खटाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या खोल्यांची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे या शाळेच्या सर्व खोल्या संबंधित विभागाने मंजूर करून बांधकाम त्वरीत सुरु करावे. याबाबत कार्यवाही केली नाही तर शाळा बंद व टाळेठोक आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा चितळी ग्रामस्थांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिला  आहे.

चितळी  शाळेचे बांधकाम 1962 मध्ये लोकवर्गणीतून झाल्यानंतर तत्कालिन सरपंच स्व. भाऊसाहेब पवार यांच्या   काळात जिल्हा परिषदेकडे शाळा वर्ग करण्यात आली. माजी पंचायत समिती सदस्या आनंदी पवार व माजी पंचायत समिती सदस्य विनोद पंडित यांच्या फंडातून कौले, पत्रा घालण्यात आला. मात्र भिंती, फरशी तशीच असल्यामुळे आज भिंतींना तडे गेले आहेत. बारिक माती मिश्रीत दगड,  विटा खाली पडत आहेत. तसेच फरशीही खचली आहे. त्यामुळे या शाळेच्या संपूर्ण खोल्या धोकादायक झाल्या आहेत.

तसा दाखलाही बांधकाम विभागाने  9 जानेवारी 2017  रोजी दिला आहे.  सध्या ही शाळा पहिली ते चौथी असून यामध्ये 100 हून अधिक विद्यार्थि जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. धोकादायक झालेली इमारत केव्हाही पडू शकते. या पाच खोल्या बांधून मिळाव्यात म्हणून जानेवारी 2017 मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज करण्यात आला. मात्र, संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर सुमारे एका वर्षाने एक खोली मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे  पंचायत समिती सदस्य हिराचंद पवार, सरपंच साधिका पवार, शाळा समितीच्या अध्यक्षा रेखा पवार यांच्यासह  ग्रामस्थांनी पाच खोल्या मंजूर न झाल्यास शाळा बंद व टाळे ठोकण्याचा इशारा दिला  आहे.