Tue, Mar 19, 2019 03:27होमपेज › Satara › चिमुरड्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्टच

चिमुरड्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्टच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

वाठार निंबाळकर, ता. फलटण येथे शिवानी कदम (वय 11 महिने) व शिवराज कदम या बहीण-भावंडांचा मृत्यू व त्यांचे आई-वडील अत्यवस्थ कसे झाले याचे निश्‍चित कारण अद्यापही समजलेले नाही. शवविच्छेदनानंतर शिवराजचा व्हिसेरा राखून ठेवला असल्याने त्या आधारे ठोस माहिती लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रांताधिकारी, कृषी अधिकारी व पोलिसांनी कदम कुटुंबांच्या घराची पाहणी केली. मक्याची पोती ठेवलेली खोली, किटकनाशक औषधांचे पाकिटे  यांचा पोलिसांनी पंचनामा केला. 

वाठार निंबाळकर येथील दोन भावंडांच्या आकस्मिक मृत्यू तालुका हादरला होता. दरम्यान प्रांताधिकारी संतोष जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, पोनि अशोक शेळके व तपासी अधिकारी यांनी कदम कुटुंबियांच्या घराची पाहणी केली. कदम कुटुंबियांना झालेला आजार मक्याला लावण्यात आलेल्या किटकनाशकामुळेच झाल्याच्या शंकेने संबंधित मका दाण्याची 9 पोती शेतातील घरात ठेवण्यात आली होती. अधिकार्‍यांनी शेतातील या घरास भेट देवून मका पोत्यांची पाहणी केली व प्रत्येक पोत्यातील मका दाण्यांचे वेगवेगळे नमुने घेतले. तसेच फलटण शहरातील किटकनाशक खरेदी केले त्या दुकानाला भेट देण्यात आली. त्याठिकाणी बिल घेतल्याचे नांेंद नसली तरी दुकानातून किटकनाशके घेतल्याचे सांगण्यात आले. 

मका दाण्याला औषध लावून पोत्यात भरुन एका खोलीत ठेवण्यात आले त्याच खोलीत हे कुटुंब झोपले होते. दरवाजा, खिडक्या बंद असल्याने पूर्ण रात्र या औषधाचा विपरित परिणाम होवू शकतो. त्यातून हे घडले असल्याची शक्यता प्रथमदर्शनी व्यक्त होत आहे. तथापि वैद्यकीय अहवाल, व्हिसेरा रिपोर्ट व अन्य माहिती नंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.