Mon, May 25, 2020 22:05होमपेज › Satara › डॉ. मायी, डॉ. पटेल यांना ‘रयत’चे पुरस्कार जाहीर

डॉ. मायी, डॉ. पटेल यांना ‘रयत’चे पुरस्कार जाहीर

Published On: May 06 2018 1:11AM | Last Updated: May 05 2018 11:09PMसातारा : प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात येणारा सन 2017-18 या शैक्षणिक वर्षाचा पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार माजी कृषि आयुक्‍त डॉ. चारूदत्त मायी यांना व रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. अमृता पटेल यांना जाहीर झाला असून या दोन्ही पुरस्काराचे वितरण 9 मे रोजी खा. शरद पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी दिली.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक  संशोधनात्मक, कृषि आणि राजकीय क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करणार्‍या व्यक्‍तीला संस्थेच्यावतीने पुरस्कार दिला जातो. त्यानुसार या पुरस्कारासाठी डॉ. चारूदत्त मायी यांची निवड करण्यात आली असून 2 लाख 50 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मायी यांनी अध्ययन, अध्यापन, लेखन आणि कृषि संशोधन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावली आहे.

कृषि संशोधनास चालना देतानाच पीक शास्त्र, पशुपालन, मत्स्य पालन, वन शेती यांची सांगड घालून शेतकर्‍यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी रचनात्मक कार्य करून राष्ट्रीय विकासात महत्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्‍तीस दरवर्षी संस्थेतर्फे रयत माऊली हा पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार डॉ. अमृता पटेल यांना पुरस्कार जाहीर झाला असून 2 लाख 50 हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.