Sat, Aug 24, 2019 00:08होमपेज › Satara › सातारा-जावलीचा उमेदवार योग्यवेळी जाहीर करू ना. चंद्रकांत पाटील 

सातारा-जावलीचा उमेदवार योग्यवेळी जाहीर करू ना. चंद्रकांत पाटील 

Published On: May 13 2018 2:18AM | Last Updated: May 12 2018 11:04PMसातारा : प्रतिनिधी

सातारा-जावली मतदारसंघातील बलाढ्य उमेदवाराविरोधात गेल्यावेळी भाजप पूर्ण ताकदीने लढले होते. त्यावेळी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या मतदारसंघातील जनता शिवेंद्रराजेंच्या विरोधात मतदान करेलच असे नाही. जनसंपर्क कार्यालय उघडं आहे का हे मी बघणार? कुलूप दिसलं की तुम्हाला तिकीट द्यायचं की नाही याचा विचार करू. सातारा-जावली विधानसभेचा उमेदवार कोण दीपक पवार की अन्य कोणी हे योग्य वेळी जाहीर केले जाईल, अशा शब्दात महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी तिकीट वाटपाबाबतची आपली भूमिका जाहीर केली.

भाजपाच्या सातारा जावली विधानसभा मतदार संघांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जि.प. सदस्य दिपक पवार, मनोज घोरपडे, महेश शिंदे, संदीप शिंदे, सातारा पालिकेचे गटनेते, नगरसेवक धनजंय जांभळे, विजय  काटवटे, सागर पावशे, सिध्दी पवार उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले, तुम्हाला सातारमध्ये आ. शिवेंद्रराजेंच्या विरोधात मते देतील ना देतील हे सर्व नशीबाचे भाग असतील. एका दिवसात किंवा एका रात्रीत एका क्षणामध्ये राजकारणात सगळं बदलत असते. त्यामुळे मला असे वाटते की त्यावर भर न देता लोकं मतं देतील. मला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे केलं पाहिजे.  दिपक पवार हे गेल्या वेळचे विधानसभेचे उमेदवार होते. आमच्या सारख्यांची मदत नसताना त्यांनी खूप टक्कर दिली. बलाढ्य माणसाशी टक्कर दिली. किंबहुना त्यांना बलाढ्य माणसाशी टक्कर देण्यात नेहमी मजा येते. किरकोळ उमेदवार उभा राहिला तर ते त्याला टक्कर देणार नाहीत. सगळ्या टिमने मिळून काम केले पाहिजे. येत्या विधानसभा निवडणूकीत  दिपक पवार किंवा अन्य कोण हे आयत्या वेळेला ठरवले जाईल. पण, ही जागा भाजपने जिंकली पाहिजे. यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे. या प्रयत्नांमध्ये लोकांचे साधे साधे प्रश्‍न असतील ते विषय शांतपणे ऐकून प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

सातारा शहरात  भाजपाचे कार्यालय सुरू व्हावे असा पार्टीचा बर्‍याच दिवसाचा अग्रह होता. सन 2019 मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका लागणार आहेत. लोकप्रतिनिधींनी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कार्यालयामध्ये उपलब्ध असले पाहिजे. येणार्‍या नागरिकांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत. बरीचशी कामे ही पत्रे देवून कामे होतात  जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालिकासह अन्य कार्यालयात असणार्‍या कामाचा स्वत:च पाठपुरावा केला पाहिजे. कार्यालय हे त्या माणसाला मदत देणारे सेंटर असले पाहिजे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सातारा नगरपालिकेचे माजी गटनेते धनंजय जांभळे यांच्या कार्याचेही कौतुक केले.

दिपक पवार म्हणाले, सातारा-जावली विधान सभा मतदारसंघांच्या जनसंपर्क कार्यालयातून  पक्षसंघटना वाढीबरोबर लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्रामीण भागातील  धरणाचे व पुनर्वसनाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महसूलमंत्र्यांनी प्रयत्नशील रहावे. यावेळी अ‍ॅड नितीन शिंगटे, प्रभाकर साबळे, मधुकर नलवडे, निलेश नलवडे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठा आरक्षणाची लढाई सरकार ताकदीने लढणार
मागासवर्गीय आयोग सध्या महाराष्ट्रभर फिरून माहिती घेत आहे. त्याचा अहवाल न्यायालयात सादर झाल्यावर मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती कायदेशीर लढाई सरकार ताकदीने लढेल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी न्यायालयाने केलेल्या सूचनेप्रमाणे शासनाने मागासवर्गीय आयोग नेमला आहे. आयोगाला आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. येत्या काही दिवसात आयोग आपला अहवाल न्यायालयात सादर करेल. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती कायदेशीर लढाई सरकार ताकदीने लढणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे, असेही ना. चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.