Thu, Jun 20, 2019 01:56होमपेज › Satara › पासपोर्ट केंद्रामुळे सातारकरांच्या सेवेची संधी 

पासपोर्ट केंद्रामुळे सातारकरांच्या सेवेची संधी 

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 14 2018 10:53PMसातारा : प्रतिनिधी

सातारा येथे सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे  लोकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. पासपोर्ट सेवा केंद्राचा सातारा जिल्ह्यातील लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. सातारकरांच्या प्रेमामुळे एक प्रकारची उर्जा व प्रेरणा मिळते. त्यातून सेवा करण्याची भावना निर्माण होते, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. 

पोवईनाका येथे विदेश मंत्रालय व भारतीय डाक विभाग साताराच्यावतीने  पासपोर्ट सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्राचे उदघाटन खा. उदयनराजे भोसले व मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आ. आनंदराव पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, प्रवर अधिक्षक राम धस व पदाधिकारी उपस्थित होते.

खा. उदयनराजे म्हणाले, देशभरात पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये सुसत्रता आणली त्याचे सर्व श्रेय परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांना जाते. पासपोर्ट सेवा केंद्र चालायचे असेल तर  50 ते 60 पासपोर्टची नोंदणी झाली पाहिजे. याची संपूर्ण जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सातारा जिल्ह्याला आगळीवेगळी परंपरा आहे. अनेक चळवळी या जिल्ह्यात निर्माण झाल्या. आज  सर्वत्र जागतिकीकरणाचे युग आहे. त्यावेळेस पासपोर्टची आवश्यकता भासते. पासपोर्टच्या माध्यमातून मुले व मुली परदेशात जावून उच्च शिक्षण घेतील. परदेशी शिक्षण घेवून आलेले विद्यार्थी  देशातील अन्य विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या माध्यमातून योगदान देतील, असा विश्‍वासही खा. उदयनराजेंनी व्यक्‍त केला. 

भारतीय विदेश सेवा सचिव ज्ञानेश्‍वर मुळे म्हणाले, कोल्हापूर व सांगली येथे पासपोर्ट केेंद्रे सुरू झाली मात्र सातार्‍यात पासपोर्ट केंद्राबाबत मला खंत होती. पासपोर्ट सेवा केंद्राबाबत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे कार्यालय झाले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी पासपोर्ट सेवा केंद्र सातार्‍यात सुरू होत असल्याने हा योगायोग आहे. गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत देशात 193 पासपोर्ट कार्यालये सुरू झाली असून सातारचे 194 वे कार्यालय आहे. तसेच पंढरपुरला येत्या 2 महिन्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. पुढील 6 महिन्यात 32 जिल्ह्यात ही कार्यालये सुरू होतील. पासपोर्ट हे आजच्या आधुनिक काळातील पंख आहे. पासपोर्ट म्हणजे आधारकार्ड, पॅनकार्ड , मतदान ओळखपत्र नव्हे तर भारतातील एकमेव दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज म्हणजे या देशाचा नागरिक आहे. येत्या 6 महिन्यात देशभरात 251 ठिकाणी पासपोर्ट केंद्रे उभी करण्यात येणार आहेत. प्रत्येक गावात, प्रत्येक घरात पासपोर्टची सेवा देण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे.

रिजनल पासपोर्ट ऑफीसर अनंतकुमार ताकवले यांनी मनोगत व्यक्‍त केले.