Sun, Aug 25, 2019 07:59होमपेज › Satara › पाटणच्या नेत्यांची ‘चाय पे चर्चा’?

पाटणच्या नेत्यांची ‘चाय पे चर्चा’?

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 9:46PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

देशात व राज्यात ‘चाय पे चर्चा’ करत भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्याकाळात राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सत्तेपासून दूर रहावे लागले. पाटण तालुक्यात ज्या ज्या वेळी ही आघाडी असते त्या त्या वेळी येथे पक्षासह नेत्यांनाही अच्छे दिन असतात. तर आत्तापासूनच या तालुक्याला विधानसभा निवडणुक व आगामी राजकारणाचे वेध लागले आहेत. अशाच पार्श्‍वभूमीवर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर व राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांच्यामधील चाय पे चर्चेची चर्चा येथे चांगलीच रंगली आहे. 

पाटण तालुका आणि राजकीय संवेदनशीलता जगजाहीर आहेच. काठावरचाच जय पराजय यामुळे इतरांच्या मदतीशिवाय राजकारण अशक्यच. त्यामुळे मग कोणही कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू असूच शकत नाही. पारंपरिक पाटणकर व देसाई हे दोनच राजकीय गट वगळता मग अन्य पक्ष, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मित्र, शत्रूच्या भूमिका या नेहमीच बदलत आल्या आहेत. परंतु जस जशा निवडणूका जवळ येतील तस तसे येथे सर्वच नेत्यांचे मैत्रीचे ऋणानुबंध अधिकाधिक दृढ होतानाही पहायला मिळतात. तर काही वेळा शह काटशहाच्या राजकारणासाठीही अशा मैत्री अथवा शत्रूत्वाचा फायदा उठविण्यात इथली मंडळी तरबेज आहेत. 

पाटणमधील एका हॉटेलच्या उद्घाटनानिमित्त सत्यजितसिंह पाटणकर व हिंदुराव पाटील हे दोन्ही मान्यवर एकत्र आले. त्याच हॉटेल मध्ये गरमागरम वड्याचा आस्वाद घेत त्यांनी चाय पे चर्चाही केली. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यात नक्की काय संभाषण झाले हा संशोधनाचा विषय असला तरी त्यांच्या देहबोलीतून बरचसं काही पहायला मिळत होतं. 

त्यामुळे या चर्चा घरगुती, वैयक्तिक असल्या तरी लवकरच होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठीची ही साखरपेरणीही नजरेआड करून चालणार नाही. या दोन्ही नेत्यांनी कधी आघाडीतून एकत्र तर कधी बिघाडीतून आमनेसामनेही निवडणूका लढल्या आहेत. सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सत्तेविना चे शहाणपण चांगलेच समजल्याने मग येणार्‍या निवडणुकात आघाडीचे सार्वत्रिक प्रयत्नही सुरू आहेत. 

अशाच प्रकारचे प्रयत्न जर स्थानिक पातळीवरूनही झाले तर निश्‍चितच येणारा भविष्यकाळ हा राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेससाठीही चांगलाच ठरू शकतो. त्यामुळे सत्यजितसिंह व हिंदुराव पाटील यांच्या या ‘ जुळून येती रेशीमगाठी ’ला तितकेच सकारात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे हे नक्कीच.