Sat, Mar 23, 2019 02:29होमपेज › Satara › चाहूरचा सेवा रस्त्यावरील प्रवेश बंद

चाहूरचा सेवा रस्त्यावरील प्रवेश बंद

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 8:58PM

बुकमार्क करा

खेड  : अजय कदम

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत खेड, ता. सातारा ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसलेल्या चाहूर या महसुली गावासाठी असलेला अनेक वर्षांपासूनचा सेवा रस्त्यावरील प्रवेश  बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सुमारे 2 कि. मी. चा हेलपाटा पडत असून गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.  सेवा रस्त्याच्या बंद केलेल्या जागेच्या ठिकाणी पादचारी उड्डाणपूल करण्याची मागणी ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. 

खेड, ता. सातारा ग्रामपंचायतीच्या हद्दीतून पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.4 जात आहे. येथील महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या पूर्वेला चाहूर हे सुमारे तीन हजार लोकसंख्येचे महसुली गाव वसलेले आहे. या गावाला जोडणारा महामार्गावरील जुना पोहोच रस्ता  नव्याने करण्यात आलेल्या सेवारस्त्यातच बंद केलेला आहे. 

त्यामुळे विद्यार्थी, महिला, व ग्रामस्थांना सुमारे  2 कि.मी अंतरावरील उड्डाणपूल ओलांडून सातारा शहरात येणे जाणे करावे लागत आहे. या कसरतीमुळे वेळेचा अपव्यय होत असून उड्डाणपुलानजीकच्या सेवा रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणारी वाहने आणि त्यातून होणारे अपघात यामुळे विद्यार्थी, महिला, ग्रामस्थांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

सकाळी व सायंकाळी उड्डाणपूलानजिक असलेल्या मोठ्या प्रमाणातील वर्दळीमुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागत आहे. येथील धोकादायक परिस्थिती पाहता चाहुर गावाला जोडलेल्या सेवा रस्त्याच्या जागी पादचारी उड्डाणपूलाची उपाययोजना केल्यास विद्यार्थी, महिला, व ग्रामस्थांना पिरवाडी-गोरखपूरमार्गे जाणे-येणे सोयीचे होणार आहे. तर महामार्गावरील वाहतुकीमुळे दुर्घटनेला सामोरे जाण्याऐवजी महामार्ग प्रधिकरणाने चाहूर येथे पादचारी उड्डाणपूल उभारल्यास विद्यार्थी, महिला व ग्रामस्थांना जीव धोक्यात घालवावा लागणार नाही. प्राधिकरणाने यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

दरम्यान, खेड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत येथील पादचारी उड्डाणपूल मागणीचा ग्रामस्थांनी ठराव केला. संबंधित अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.