Thu, Jul 18, 2019 16:29होमपेज › Satara › ५२ कोटींची फसवणूक; ७ जणांवर गुन्हा

५२ कोटींची फसवणूक; ७ जणांवर गुन्हा

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 30 2018 10:58PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर 

पाचगणी येथील एका कुटूंबाची मिळकत खोट्या कागदपत्रांच्या आधारे परस्पर एस. एम. बाथा एज्युकेशन ट्रस्टला विकून 52 कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी  7 जणांविरोधात महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तीन जण हे इंग्लड देशातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाचगणी येथील नगरयोजना क्र. 3 मधील प्लॉट नंबर 464 ही मिळकत जाल पेस्टनजी विरजी यांच्या मालकी वहीवाटीची होती. त्यांच्या मृत्यूनंतर या मिळकतीवर त्यांची मुले फिरोज व पेसी विरजी तर मुली जॉर्ज गुल जॉर्ज ब्लकनर्ब, खोरशिद होमी भरूचा व शिरीन जमशेद लिलाउवाला यांची नावे मिळकतीच्या दस्तावर नोंद करण्यात आली. फिरोज यांच्या निधनानंतर त्यांनी केलेल्या मृत्यूपत्रानुसार फिरोज यांच्या हिश्याची मालकीन पत्नी डॉली विरजी झाल्या. फिरोज यांनी याच मृत्यूपत्रात दोराब बक्‍तियार पांडे यांची विश्‍वस्त म्हणून मिळकतीवर नोंद केली. दारोबा पांडे यांच्या डॉली विरजी या मावशी होती. डॉली यांना कोणताही वारस नसल्याने त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात पांडे यांच्या नावावर त्यांची सर्व मिळकत केली. 

या मिळकतीच्या इतर वारसदार गीता रूसी चोक्सी रा. नाना चैक मुंबई, सायरन होमी भरूचा रा. कल्याणी नगर पुणे, डॅफने पेसी विरजी रा. बेंगलोर, झाल पेसी विरजी, जीमी पेसी विरजी व रॉय पेसी विरजी हे तिघेही रा. इंग्लंड व मोहीणी सुदर्शनम रा. बेंगलोर यांना या मिळकती मधील पांडे यांच्या हिश्श्याची माहिती होती. मिळकतीवर व हिस्सेदारांबरोबर पांडे यांच्या नावाची नोंद करण्याची हमी या सर्वांनी दिली होती. परंतु,  मिळकत कार्डावर पांडे यांच्या नावाची नोंद न करता उलट मोहिणी सुदर्शनम यांनी भूमि अभिलेख कार्यालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून वारसदारांची खरी माहिती लपवून वरील 7 जणांनी मिळकत कार्डावर नावे नोंद करून घेतली. यामधील पांडे यांचा हिस्सा असताना त्यांची कोठेही नोंद न करता ती मिळकत परस्पर 52 कोटी रूपयांना विकण्यात आली. 

त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी पांडे यांनी महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात  गीता चोक्सी, सायरन भरूचा डॅफन विरजी, झाल विरजी, जीमी विरजी, रॉय विरजी व मोहीणी सुदर्शनम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोनि दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आशोक काशिद व श्रीकांत कांबळे हे करत आहेत.