Sat, Mar 23, 2019 16:13होमपेज › Satara › कराडात जलतरण तलावाच्या  फरशा निघाल्या

कराडात जलतरण तलावाच्या  फरशा निघाल्या

Published On: May 28 2018 1:33AM | Last Updated: May 27 2018 11:45PMकराड : प्रतिनिधी 

सुमारे अडीच लाखांचा खर्च करत दीड महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या कराड नगरपालिकेच्या जलतरण तलावाभोवती लावलेल्या दोन फरशा तसेच तलावातील एक अशा तीन फरशा निघाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. त्यामुळेच जलतरण तलावाच्या बांधकामाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून तलावाच्या संपूर्ण बांधकामाचीच गुणवत्ता तपासणे गरजेचे बनले आहे. 

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी 2013 मध्ये कराड नगरपालिकेला जलतरण तलावासाठी 2 कोटी 47 लाखांचा निधी दिला होता. त्यानंतर कृष्णा पुलानजीक नगरपालिका जागेत गेली पाच वर्ष पुलाचे काम सुरू होते. रखडलेले व मंदगतीने सुरू असणारे काम, जलतरण तलावाचे काम पूर्ण होऊन उद्घाटनाअभावी जवळपास पाच ते सहा महिने बंद असलेला तलाव यासह विविध कारणांमुळे हा जलतरण तलाव सातत्याने कराडकरांच्या चर्चेचा विषय बनला होता.

कराडमधील स्थानिक राजकारण आणि जलतरण तलावाचे पालिका पदाधिकार्‍यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना बाजूला ठेवत केलेले दीड महिन्यापूर्वी उद्घाटन हाही चर्चेचा विषय बनला होता. अखेर रडखडत का होईना, पण जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला झाल्याचे समाधान नागरिकांना होते. मात्र असे असले तरी आता अवघ्या दीड महिन्यातच तलावाच्या नदीकडील बाजूला असलेल्या दोन फरशा निघाल्या आहेत. याशिवाय लहान मुलांसाठी चार फुटाचे अंतर असलेल्या ठिकाणी तलावातील एक   फरशीही निघाली आहे.

अगोदरच कराडमधील अकरा कोटींचा रस्ता, तीन कोटींचा खर्च करून करण्यात आलेली प्रीतिसंगम बाग यासह आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून कराड नगरपालिकेने केलेल्या कामांच्या गुणवत्ता, दर्जाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. तसेच चौकशीची मागणीही जोर धरू लागली असून जलतरण तलावाच्या कामाबाबतचा हा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दीड महिन्यात फरशा निघातातच कशा ? - पठाण
जलतरण तलावाचे काम रखडल्यानंतर कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्याचवेळी आता फरशा निघाल्याचे समोर आल्याने अडीच कोटींचा खर्च करूनही दीड महिन्यात फरशा निघतातच कशा? असा प्रश्‍न उपस्थित करत या संपूर्ण बांधकामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी काँग्रेसचे पदाधिकारी झाकीर पठाण यांनी केली आहे.