Tue, Mar 19, 2019 05:09होमपेज › Satara › सातार्‍यात बस थांबे वार्‍यावर; प्रवासी रस्त्यावर

सातार्‍यात बस थांबे वार्‍यावर; प्रवासी रस्त्यावर

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 9:53PMसातारा : संजीव कदम  

सातारा शहर  व उपनगरात अनेक ठिकाणी बसथांब्यांच्या ठिकाणी असणार्‍या पिकअपशेडची वानवा असून प्रवाशांना तिष्ठत बसावे लागत आहे.  ऊन, वारा, पाऊस झेलत प्रवासी ताटकळत असतात.  विशेष म्हणजे अनेक ठिकाणच्या बसथांब्यांचा प्रश्‍न वार्‍यावर असून प्रवासी मात्र, एस.टी. व बससाठी रस्त्यावर येत असल्याचे चित्र आहे.  त्यामध्ये शहरातील शेटे चौक, पोलिस मुख्यालय, पोवईनाका (खालचा रस्ता) तसेच विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शाहू चौक या थांब्यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी विविध समस्यांच्या कोंडाळ्यात हे बसथांबे हरवून गेले असून शहरासह उपनगरातही या प्रश्‍नाचे अनेक ठिकाणी त्रांगडे होऊन बसले आहे.

सातारा शहराबरोबरच खेड, पिरवाडी, कृष्णानगर, संगमनगर, कोडोली, करंजे, गोडोली, सदरबझार, शाहूपुरी, औद्योगिक वसाहत, आयटीआय, शाहूनगर, तामजाईनगर,  विकासनगर, विलासपूर,  बारावकरनगर या उपनगरात शहर बससेवा सुरू आहे. त्याशिवाय क्षेत्रमाहुली, महागाव, आरळे, वडूथ, शिवथर, मालगाव या आजूबाजूच्या गावापर्यंतही ही सेवा राजवाडा बसस्थानक व सातारा आगारातर्फे पोहोचवली जाते. सध्या दररोज सुमारे 250  हून अधिक फेर्‍या सुरू आहेत. या बस दररोज सुमारे 4849.5 किलोमीटर पल्ला गाठून सुमारे लाखो रुपयांचे उत्पन्‍न मिळवतात. ग्रामीण विभागातही या बससेवेचा समावेश असल्याने प्रवाशांकडून शहर बससेवेला चांगला प्रतिसाद मिळतो. पहाटे साडेपाच वाजल्यापासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत ही बससेवा सुरू असते.

एकेरी वाहतुकीमुळे कर्मवीर भाऊराव पाटील पथ (खालचा रस्ता) या मार्गावरील बसथांब्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने सातारा नगरपालिका, आरटीओ तसेच एसटी प्रशासनाला यावर तातडीने उपाययोजना करण्याची सुचना केली. यावेळी काही सामाजिक संघटनांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आक्रमक भूमिका  घेतली होती. मात्र, बराच कालावधी लोटून गेला तरी खालच्या रस्त्यावर एकही बसथांबा उभा राहू शकला नाही. बसथांबे अस्तित्वात नसल्याने थांबायचे कोठे अशा संभ्रमात नागरिक आहेत.