Sun, May 19, 2019 22:01होमपेज › Satara › एसटी काळ्या धुरांच्या रेषा हवेत सोडी

एसटी काळ्या धुरांच्या रेषा हवेत सोडी

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 9:04PMसातारा : प्रविण शिंगटे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक एसटी बसेसची कालमर्यादा संपली असूनही या बसेस धुराचे लोट सोडत  धावत आहेत. या बसेसमुळे हवेचे प्रदूषण वाढत चालले असून  नागरिक व प्रवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. संबंधित बसेसवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने  कारवाई करावी, अशी मागणी विविध पर्यावरणप्रेमी व नागरिकांमधून होत आहे. 

एसटी महामंडळाची सेवा ही संपूर्ण राज्यभरात आहे. खात्रीचा आणि किफायतशीर प्रवास अशी एसटीची आजही ओळख कायम आहे. सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, पारगाव खंडाळा, मेढा, फलटण, कोरेगाव, दहिवडी, वडूज आदी 11 आगारातून सुमारे 700 एसटी बसेसमधून हजारो प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यामुळे दररोज लाखो रूपयांचा महसूल मिळत असतो. मात्र, विविध आगारातील  एसटी बसेसचे आयुष्यमान आरटीओ निकषानुसार संपलेले आहे. तरीही या बसेसची तात्पुरती डागडूजी करून त्या ग्रामीण भागात पाठवल्या जातात.  या बसेस कुठेही बंद पडत असतात. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बहुतांश एसटी बसेस प्रचंड धूर ओकताना दिसत आहेत. बाहेर पडणार्‍या या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे.

बसमधल्या प्रवाशांना या धुरांचा त्रास होत नसला तरी प्रत्यक्षात  रस्त्यावरील वाहनधारक, पादचारी, नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे.  अशा अनेक बसेस रस्त्यावरून धावत आहेत. धुरामुळे एसटी कर्मचार्‍यांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. एसटीच्या धुरासंदर्भात नागरिकांनी आरटीओ कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. एसटीचे अधिकारी मात्र याकडे  फारसे  गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाहीत. त्यामुळे  तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी काही एसटी बसेसवर कारवाईही केली होती. त्यानंतर थोड्या फार प्रमाणात एसटी बसेस सुस्थितीत बाहेर पडत होत्या. मात्र, पुन्हा पहिले पाढे पंच्चावन अशी अवस्था एसटी महामंडळाची झाली आहे.