Thu, Apr 18, 2019 16:41होमपेज › Satara › फाळकुटदादा गोळा करताहेत ‘प्रोटेक्शन मनी’

फाळकुटदादा गोळा करताहेत ‘प्रोटेक्शन मनी’

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 10:52PMखेड : अजय कदम

सातारा -कोरेगाव रस्त्यावरील  विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते संगमनगर मार्गावरील पदपथ  विक्रेत्यांनी बळकावला आहे. या परिसरातील अतिक्रमणांमध्ये मोठे अर्थकारण दडले असून कोणी स्थानिक फाळकुटदादा  या ठिकाणी बांधकाम विभागातील अधिकार्‍यांच्या  आशीर्वादाने प्रोटेक्शन मनी गोळा करतो. त्यांच्या परवानगीशिवाय या ठिकाणी खोकच काय पथारीही पसरता येत नाही, हे उघड गुपित असून येथील विक्रेत्यांकडून गोळा होणारे हप्ते कोणत्या अधिकार्‍यांना जातात? ही आर्थिक साखळी तोडून रस्त्यावर आलेल्या पादचार्‍यांसाठी पदपथ रिकामा करण्याचे धाडस जिल्हा प्रशासन दाखवणार का? असा सवाल सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.

सातारा-कोरेगाव रस्त्यावरील जिल्हा परिषद चौक, विसावा नाका, विसावा पार्क व पुढे बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते संगमनगर या मार्गावरील दोन्ही बाजूंची अतिक्रमणे जिल्हा प्रशासनाने गेल्या दीड, दोन वर्षांत तीन, चार वेळा हटवली. मात्र, मोहीमेची पाठ वळताच विक्रेत्यांनी पुन्हा दुकाने थाटली.जि.प. चौकातून शासकीय विश्रामगृह, विसावा नाका परिसर,  विसावा कॅम्प समोरील छ.शाहू अ‍ॅकॅडमी रस्ता ते बॉम्बे रेस्टॉरंट पुढे कृष्णानगर, संगमनगर पर्यंत टपर्‍यांनी पदपथ काबीज केला. सुरुवातीला काहींनी छत केले.आता त्या ठिकाणी पक्‍की खोकी टाकण्यात आली आहेत. बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाणपुलाखाली तर दिवसेंदिवस टपर्‍यांमध्ये वाढ होत आहे.

येथील बेरोजगारीच्या नावाखाली टाकलेल्या टपर्‍यांमधून नक्की काय विकले जाते हा संशोधनाचा विषय असला तरी त्याकडे बांधकाम विभागाची होणारी डोळेझाक अर्थपूर्ण असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. येथील चौकानजीक बांधकाम विभागाची जागा असून तेथे सध्या झोपड्यांचे मोठे अतिक्रमण आहे. या झोपड्यांना कोणाचा आशीर्वाद आहे? झोपड्यांमधून कोणती दुकानदारी सुरू आहे. याकडे बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन पहाणार का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रूपये खर्च करून येथील रस्त्यावर पदपथ बांधला व पेव्हरही टाकले. आता त्याच पदपथावर विक्रेत्यांनी टपर्‍या टाकल्याने हे सुशोभीकरण व सुखसोयी अतिक्रमणधारकांसाठीच का?  असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सातार्‍यातून गुंडगिरी हद्दपार झाल्याचा दावा राजकीय व्यासपीठावरुन होतो. पण या परिसरातील हप्तेखोरांच्या कॉलरला हात घालण्याचे आणि त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे आव्हान पोलीस दलासमोर असून हे आव्हान जिल्हा व पोलिस प्रशासन स्वीकारणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.