होमपेज › Satara › सर्जा-राजाची  जोडी नामशेष होण्याच्या मार्गावर...!

सर्जा-राजाची  जोडी नामशेष होण्याच्या मार्गावर...!

Published On: May 21 2018 1:19AM | Last Updated: May 20 2018 8:16PMपुसेसावळी : विलास आपटे

आधुनिक युगात यांत्रिकीकरणाचा परिणाम सर्वच क्षेत्रात दिसून येऊ लागला आहे. बळीराजाही सर्रास या यांत्रिकीकरणाचा उपयोग करून आधुनिक  शेती करू लागला असल्याने सर्जा-राजाची जोडी आता नामशेष होऊ पाहत आहे. 

पारंपरिक बैल जोपासण्याच्या पद्धतीत काळानुरूप बदल होऊ लागला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शेतकर्‍यांच्या जीवाभावाचा मित्र सर्जा राजा आधुनिक युगातील शेतीमुळे दुर्लक्षित होऊ लागला आहे. परिणामी चांगल्या जातीच्या बैलांचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पूर्वी प्रत्येक बळीराजाकडे एक बैलजोडी व एखादी खिलार गाय असायची. बैलांचा वापर करून सकाळी तांबडं फुटल्यापासून तो आपल्या शिवारामध्ये मशागत करण्यात मग्न असायचा. बैलांच्या गळयातील घुंगरांचा चाळ संपूर्ण शिवार दुमदुमून सोडायचा. या चाळांबरोबर शेतकरी बैलांसाठी गायल्या जाणार्‍या गाण्याचा ठेका धरायचा. अलीकडे यांत्रिकीकरणामुळे हा सूरच लोप पावला आहे. इस्लामपूर, पंढरपूर, खरसुंडी, मंगळवेढा, कराड, उंब्रज, येथील यात्रा व जनावरांच्या बाजारातून बळीराजा वेगवेगळ्या जातींचे पाडी खरेदी करायचा. त्यांना जिवापाड जपून चांगले बैल तयार करायचा. या बैलांचा वापर करून शेतीची सर्व कामे उरकायचा.

अलीकडे मात्र,  यांत्रिकीकरणामुळे या बैलांचा वापर हळूहळू कमी होऊ लागला. बळीराजा एकच बैल पाळून दुसर्‍या शेतकर्‍याचा बैल घेऊन पैरा पद्धतीने मशागत करू लागला. पुढे यातही बदल होत गेला, हंगामापुरते बैल विकत घेऊ लागला. मशागत झाली की ते बैल विकून टाकणे, असा प्रकार सुरू झाला.आता तर सर्रास ट्रॅक्टरने शेती करणे बळीराजाने सुरू केले आहे.त्यामुळे परंपरागत चालत आलेली सर्जा राजाची जोडी आता शिवारातून नामशेष होऊ लागल्याचे चित्र आहे.