Thu, Apr 25, 2019 05:24होमपेज › Satara › हुश्शार सातार्‍याची पोरं, व्यवहारज्ञानात कच्ची 

हुश्शार सातार्‍याची पोरं, व्यवहारज्ञानात कच्ची 

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 1:41AMसातारा : प्रवीण शिंगटे 

काही दिवसांपूर्वी असर या संस्थेमार्फत राज्यातील 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. वाचन, मातृभाषेचे ज्ञान, गणित, सामान्य ज्ञान, व्यवहार ज्ञान आणि इंग्रजी या गोष्टींवर फोकस ठेवून हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये 61 टक्के मुलांना भागाकार येत नाही, 27 टक्के मुलांना इंग्रजी वाचता येत नाही, तर सुमारे 30 टक्के मुलांना व्यवहारिक ज्ञान समजत नसल्याचे अहवालातून समोर आले आहे. हुश्शार सातार्‍याची पोरं व्यवहारज्ञानात कच्ची असल्याचे या अहवालावरून समोर आले आहे. 

असर या संस्थेकडून जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 60 गावांतील 954 घरांमधील 1 हजार 196 युवक-युवतींचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 14  ते 18 वयोगटातील मुले सध्या काय करत आहेत, त्यांच्यामध्ये डिजिटल जागरूकता आहे का, भविष्यात त्यांना काय करायचे आहे. या मुद्द्यांवर सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन व जकातवाडी येथील यशवंतराव चव्हाण सामाजिक विकास विद्यालयातील सुमारे 70 सर्वेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. 

या सर्वेक्षणामध्ये या वयोगटातील 20 टक्के मुले कॉलेजची पायरी चढत नाहीत. यातील अवघे 6 टक्के मुले महाविद्यालयीन शिक्षण घेतात. तर 14 टक्के मुले ही इतर क्षेत्रांत जात आहेत. सातारा जिल्ह्याचा विचार करता 12 टक्के मुले 12 वीपर्यंतचे शिक्षण घेत नाहीत. फक्त 6 टक्के मुले महाविद्यालयीन शिक्षण घेतात. तर 6 टक्के मुले ही इतर क्षेत्रात जात आहेत हे समोर आले.

व्यवसाय प्रशिक्षणासाठी राज्यातील 5 टक्के मुले प्रवेश घेतात. तर जिल्ह्यात हेच प्रमाण 6 टक्के आहेे. राज्यात 42 टक्के मुले ही महाविद्यालय व शाळेत काम करतात. तसेच 39 टक्के मुले ही कोठेही काम करत नाहीत. तर 60 टक्के मुले घरातीलच कामावर आपले लक्ष केंद्रीत करतात. जिल्ह्यात 49 टक्के मुले ही महाविद्यालय व शाळेत काम करतात. तसेच 46 टक्के मुले ही कोठेही काम करत नाहीत. तर 53 टक्के मुले घरातीलच कामावर आपले लक्ष केंद्रीत करतात. 

या वयोगटातील मुलांची परिक्षा घेतली असता राज्यातील 23 टक्के मुलांना वाचन करता येत नाही. तर सातार्‍यात 12 टक्के मुलांना वाचता येत नाही. राज्यात तब्बल 57 टक्के मुलांना भागाकार करता आला नाही. तर जिल्ह्यात हेच प्रमाण तब्बल 61 टक्के आहे. 

राज्यात 14 वर्षांच्या तब्बल 42 टक्के मुलांना इंग्रजी वाचताच येत नाही. तर सातार्‍यातील 27 टक्के मुलांना इंग्रजी वाचता येत नाही. राज्यामध्ये 18 वर्षाच्या 21 टक्के मुलांना इंग्रजी वाक्य वाचता येत नाही. तर सातारा जिल्ह्यातील 30 टक्के मुले अशी आहेत की त्यांना इंग्रजी वाक्ये वाचता येतच नाही. त्यामुळे यामध्ये फारशी प्रगती दिसत नाही. विशेष म्हणजे, इंग्रजी भाषेतील प्रगती वाढत असल्याची दिसून येते. मात्र, त्याचवेळी गणित विषयात निराशा आहे. 

राज्यात 14 ते 18 वयोगटातील जवळपास 73 टक्के तर सातार्‍यात 80 टक्के मुले मोबाईल फोन वापरतात. 61 टक्के मुलं इंटरनेट, तर 28 टक्के मुलं कॉम्प्युटर वापरतात. त्याचवेळी 56 टक्के मुलं कधीच कॉम्प्युटर वापरत नाहीत. तर कधी 61 टक्के मुलं कधीच इंटरनेट वापरत नाहीत. तर जिल्ह्यात 42 टक्के मुले इंटरनेट वापरतात. 39 टक्के मुले संगणक वापरतात. 41 टक्के मुले कधीच इंटरनेट वापरत नाहीत. 21 टक्के मुलांनी आजपर्यंत संगणक वापरला नसल्याचे समोर आले आहे.

राज्यात 24 टक्के मुलांना नोटांच्या किमती सांगता येत नाही. तर 44 टक्के मुलांना वजने कळत नाहीत. वेळेची माहिती 17 टक्के विद्यार्थ्यांना सांगताच येत नाही. जिल्ह्यात 19 टक्के मुलांना नोटांची बेरीज करता येत नाही. 39 टक्के मुलांना एकूण वजनाची माहिती सांगता येत नाही. तर 21 टक्के मुलांना किती वाजले हेच सांगता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञानाची पातळी खालावली असल्याचे दिसते. मुळात शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांच्या मनावर सामान्य व व्यवहारीक ज्ञानाची माहिती बिंबवली जात नसल्याचे अहवालातून समोर आले आहे. भागाकार येणे ही काळाची गरज आहे. असे असताना राज्यातील 36 तर जिल्ह्यातील 34 टक्के मुलांना भागाकारच येत नसल्याचे दिसून आले आहे. तर देशाची  माहिती मिळवण्यासाठी नकाशा वाचन महत्वाचे असते. सर्व्हेक्षणामध्ये याबाबतही प्रश्‍न विचारण्यात आले. मात्र, राज्यातील 14 तर जिल्ह्यातील 5 टक्के मुलांना नकाशा वाचन करता आले नाही.