होमपेज › Satara › एकाच घरात ब्रिगेडियर, कॅप्टन अन्..लेप्टनंटही...

एकाच घरात ब्रिगेडियर, कॅप्टन अन्..लेप्टनंटही...

Published On: Jan 22 2018 10:14AM | Last Updated: Jan 22 2018 10:19AMकराड : दिलीप माने 

कराड तालुक्यातील कोणेगावला देशसेवेची परंपरा आहे. या गावाला सैनिकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. ही परंपरा जपत या गावाने आता आपली नवी ओळख निर्माण केली आहे. या गावचे सुपूत्र  सुरेश चव्हाण यांच्या घरात तीन लाल दिवे असून ते स्वतः ब्रिगेडियर तर त्यांची दोन्ही मुले लेप्टनंट व कॅप्टन पदावर कार्यरत आहेत.

वडील ब्रिगेडियर, थोरला भाऊ कॅप्टन मग आपणालाही मोठे अधिकारी झालेच पाहिजे असं स्वप्न घेऊन सैन्यात दाखल झालेले कोणेगावचे सुपूत्र रविराज सुरेश चव्हाण यांनी दाखविलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल नुकतीच त्यांची भारतीय सेनेध्ये लेप्टनंट (हेलिकॉप्टर पायलट) म्हणून निवड झाली आहे. ही आजच्या युवापिढीसाठी नक्‍कीच आदर्शवत बाब आहे. हा आदर्श जपत युवकांनी  सैन्यात भरती होवून देशसेवेकडे वळल्यास देशपातळीवर सातारा जिल्हयाचा लौकिक वाढण्यास मदत होईल, असे मत जाणकारांधून व्यक्‍त होत आहे.

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात रविराजच्या पदाच्या रूपाने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याचा आनंद तर आहेच शिवाय या सर्वोच्च पदाच्या रूपाने एकाच घरात तिसरी लाल दिव्याची गाडी दाखल  झाल्याने सैनिकी परंपरेचा वारसा असलेल्या कोणेगावमध्ये आनंद साजरा होत असून कोणेगावचे नाव देशपटलावर  सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. लेप्टनंट रविराज चव्हाण यांनी अगदी कमी  वयात हे पद प्राप्त केले आहे. इंडियन मिलीटरी अ‍ॅकॅडमी डेहराडून येथून या पदाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांची नियुक्‍ती रूडकी येथे झाली. त्यांचे थोरले बंधू किरण चव्हाण यांची 2015 मध्ये  लेप्टनंटपदी नियुक्‍ती झाली होती

सध्या ते कॅप्टन म्हणून चीनच्या सरहद्दीवर रूद्रप्रयाग येथे देशसेवा बजावत आहेत. तर वडील सुरेश गणपतराव चव्हाण हे ब्रिगेडिअर या पदावर श्रीनगर येथे कार्यरत आहेत. ब्रिगेडिअर चव्हाण यांची प्रथम  जम्मू-काश्मिर लाईट इन्फंन्ट्री येथे नियुक्‍ती झाली होती. त्यानी आत्तापर्यंत भारतातील अनेक ठिकाणच्या सीमेवर सक्षमपणे आणि कुशलतापूर्वक अशा यशस्वी जबाबदार्‍या हाताळलेल्या आहेत. त्यांनी दहा जम्मू आणि काश्मिर लाईट इन्फंन्ट्रीचे नेतृत्व करताना त्यांनी आसामच्या सिमेवर उल्फा अतिरेकी  संघटनेविरोधात ऑपरेशन राहिनो, मणिपूर येथे नागा बंडखोर विरोधात ऑपरेशन हिफाजत तर जम्मू-काश्मिरमध्ये ऑपरेशन रक्षक व  ऑपरेशन पराक्रम फत्ते केले आहे.

या मोहिमांदरम्यान अतिशय अतुलनीय असे धाडसी कार्य केल्याबद्दल त्यांचा भारत सरकारने शौर्य अ‍ॅवॉर्ड देवून गौरवही केला आहे.1944 साली क्रांतीसिंह नाना पाटील यांनी येथे भूमिगत  स्वातंत्र्यसैनिकांची पहिली सभा घेतली होती. स्वातंत्र्यसैनिकांचा हा  वारसा ब्रिगेडियर सुरेश चव्हाण व त्यांच्या दोन  सुपूत्रांनी पुढे चालविला आहे. ब्रिगेडियर सुरेश चव्हाण हे माजी पं.स.सदस्य महिपतराव चव्हाण व माजी  उपसरपंच राजकुमार चव्हाण यांचे बंधू आहेत. लेप्टनंट रविराज चव्हाण यांचे आ. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ग्रामस्थ व हितचिंतकांनी अभिनंदन केले.

एकाच घरात तीन लाल दिवे...
माणसाचे कर्तुत्व मोठे असेल तर दुनियाही त्यांना सलाम करते. असेच कोणेगाव येथील चव्हाण कुटुंबीयांप्रती घडले आहे. कोणेगावचे सुपूत्र सुरेश चव्हाण  हे ब्रिगेडियर असल्याने त्यांच्याकडे लालदिव्याची गाडी आहे, त्यांचे मोठे चिरंजीव किरण चव्हाण कॅप्टन असल्याने त्यांच्याकडे लालदिवा आहे. तर आता रविराज यांनाही लेफ्टनंटपदी रूजू झाल्याने लालदिव्याची गाडी मिळाली आहे. अशा या कुटुंबाच्या देशप्रेाला तमाम देशवासियांचा सलाम.