होमपेज › Satara › जिल्ह्यात जलयुक्‍त शिवार योजनेचा फज्जा

जिल्ह्यात जलयुक्‍त शिवार योजनेचा फज्जा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : आदेश खताळ

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या जलयुक्‍त शिवार योजनेला जिल्ह्यात ब्रेक लागला आहे. कंत्राटदारांवर नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार वाढला आहे. अनेक ठिकाणी कामे रखडली आहेत. चुकीच्या कामांनी ग्रामस्थ त्रस्त आहेत. कृषी विभागात सावळा गोंधळ सुरु असल्याने जलसंधारणाच्या कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी जलसंधारणाच्या कामावर फोकस करण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी एन. रामस्वामी यांनी जलयुक्‍त शिवार योजनेचा मजबूत पाया जिल्ह्यात घातला. त्यांच्या प्रयत्नातून पाण्याचे मृत स्रोत जिवंत झाले. राज्य शासनाने सुरु केलेली जलयुक्‍त शिवार योजना त्यांनी प्रभावीपणे राबवली. त्यांच्याच जलसंधारणाच्या कामाची बॅटन तत्कालीन जिल्हाधिकारी अश्‍विन मुद‍्गल यांनी तेवत ठेवली. त्यामुळे जलसंधारणाची कामे लोकचळवळ बनली. लोकांना पाण्याचे महत्त्व पटू लागल्याने मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग वाढला. सध्या मात्र, गावपातळीवर या कामातून अनेक दुष्टप्रवृत्‍ती निर्माण झाल्या. त्यामुळे या योजनेला घरघर लागली.  खाजगी फौऊंडेशनला महत्व दिल्याने जलयुक्‍त शिवार योजनेचे महत्व कमी झाले.

अपवाद वगळता लोकांचा या योजनेतील उत्साह कमी झाला. या योजनेत आता अधिकारीही पूर्वीसारखे हिरीरिने सहभागी होईनात. कृषी विभागाची कमालीची उदासिनता त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे जलसंधारणाची कामे रखडू लागली आहेत. स्थानिक पातळीवर ठेकेदारांचा मनमानीपणा वाढल्याने ग्रामस्थांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यावर अधिकार्‍यांचे कसलेही नियंत्रण नसल्याने बंधार्‍यांच्या कामाच्या दर्जावर परिणाम होवू लागला 

आहे. जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत कामाच्या दर्जावर प्रश्‍न उपस्थित केले होते. मात्र, संबंधित ठेकेदारांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घातले जात असल्याने जिल्ह्यात जलयुक्‍त शिवार योजनेला खीळ बसली आहे.

Tags : Satara, Satara News, break, Jalyukt Shivar,  scheme


  •