Mon, Jul 15, 2019 23:42होमपेज › Satara › सातारा: कोयनेत पोलिसांसह वन कर्मचार्‍यांना मारहाण

सातारा: कोयनेत पोलिसांसह वन कर्मचार्‍यांना मारहाण

Published On: Aug 16 2018 1:55PM | Last Updated: Aug 16 2018 1:55PMपाटण : प्रतिनिधी

कोयना विभागात (ता. पाटण) बुधवारी पंधरा ऑगस्ट दिवशी कोयना धरणाच्या गेटवर पोलिसांना तर ओझर्डे धबधब्यावर वन कर्मचार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी कोयनानगर पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली करून त्यांच्याकडील दोन चारचाकी वाहनेही जप्त केली आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  काल स्वातंत्र्यदिनी कोयना विभागात पर्यटनासाठी आलेले पर्यटकांमधील काही पर्यटकांनी कोयना धरण सुरक्षा गेटवर जावून धिंगाणा घातला. त्याठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी आकर्षण पांडुरंग  फडतरे (वय  28) यांनी दिली.  धरण गेटवर येवून आरोपी सागर शहाजी काळभोर (वय 29),  सुरज बाळासो काळभोर (वय 23), सुरज विजय भुजबळ (वय 25), शुभम दिलीप काळभोर (वय 47), समीर सयाजी काळभोर (वय 24) सर्व राहणार पाली ता. कराड, सुभाष बबन शेलार (वय 47), विशाल शंकर शेलार (वय  26 दोघे रा. शहापूर ता. कराड, हर्षवर्धन बाळासो भोसले वय 23 रा. करवडी  ( कराड ), सचिन तात्याबा काटे वय 32 रा. विद्यानगर  ( कराड ) हे नऊ आरोपी हे कोयना धरणाच्या गेटजवळ आले. त्यांनी आपणास धरण बघायचे आहे त्यामुळे तेथे सोडण्यास सांगीतले त्यावर धरण पाहण्याचा अधिकृत शासकीय परवाना आहे का ? तो दाखवा असे पोलिसांनी सांगितले. मात्र आम्हाला ओळखत नाही का ? अशी उत्तरे देत वरील आरोपींनी तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या फिर्यादी आकर्षण फडतरे, पोलीस कॉन्स्टेबल शेडगे, पोलीस नाईक बनकर तसेच मदतीला धावून आलेले पोलीस कॉन्स्टेबल काळेल यांना मारहाण केली. त्यानंतर वरील नऊही आरोपींना अटक करून त्यांच्याविरूद्ध शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण, जमावाने कायदा व सुव्यवस्था मोडणे आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान याच दिवशी ओझर्डे धबधबा येथेही जावून तेथे गेटवरील वन कर्मचार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी कोयनानगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत स्थानिक वनरक्षक जावेद बाबुलाल मुल्ला (वय 42) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विक्रम विनायक साबळे (वय 32), समीर मधुकर साबळे (वय 27), सुरज लक्ष्मण साबळे (वय 26)0 व प्रमोद संपत साबळे सर्व राहणार वडूथ ता. सातारा हे चौघेजण ओझर्डे धबधबा गेटजवळ आले. त्यांनी आपले मित्र धबधबा पहाण्यासाठी पुढे गेले आहेत आम्हालाही सोडा असे सांगितले. त्यावर स्थानिक कर्मचार्‍यांनी धबधबा पाहण्यासाठी तिकीट काढण्याचे संबंधितांना सांगितले. त्यावर चिडून जावून या चारही आरोपींनी तेथे असणाऱ्या फिर्यादी जावेद मुल्ला, वनरक्षक पांडुरंग कुलाळ, श्रीकांत गोतपागर या कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करून कर्मचार्‍यांकडे असलेल्या काठीने मारहाण केली. त्यानंतर शासकीय कर्मचार्‍यांना मारहाण, जमावाने कायदा व सुव्यवस्था मोडीत काढणे आदी कलमान्वये संबंधितांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी विक्रम साबळे, समीर साबळे, सुरज साबळे,  प्रमोद साबळे  या चौघांना अटक करण्यात आली आहे.