Sun, Nov 18, 2018 08:06होमपेज › Satara › मारहाण करून युवकाचे अपहरण

मारहाण करून युवकाचे अपहरण

Published On: Mar 09 2018 1:37AM | Last Updated: Mar 08 2018 11:33PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या पार्किंगमध्ये गुरुवारी भरदुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन महिलांसह पाच जणांनी एकाला फिल्मी स्टाईलने बडवत चारचाकी वाहनात जबरदस्तीने बसवून नेल्याची थरारक घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, मारहाण करणार्‍यांनी पोलिस असल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या कोणाच्याही अंगावर तशी वर्दी नव्हती. यामुळे नेमकी घटना काय? मारहाण करणारे व मार खाणारा कोण? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

याबाबत  घटनास्थळावरून समजलेली प्राथमिक माहिती अशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीजवळ गुरुवारी दुपारी 12.30च्या सुमारास एक युवक थांबलेला होता. यावेळी त्याच्यावळ दोन महिला उभ्या होत्या.  त्याठिकाणी एक बोलेरो जीप आली व त्यातून तिघेजण खाली उतरले.  थांबलेल्या युवकाला दोन महिलांसह पाच जणांनी गाठले व त्याठिकाणी युवकाला घेरून विचारपूस करू लागले. पाहता पाहता वादावादीला सुरुवात झाली. संबंधित युवकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीबाहेर हा प्रसंग घडल्याने परिसरात बघ्यांची गर्दी उसळली. आरडाओरडा झाल्याने इमारतीमधून लोक पळत बाहेर येऊ लागले. मार खाणारा युवक बचावासाठी प्रयत्न करत होता, मात्र त्याला सोडवण्यासाठी कोणीही गेले नाही. सुमारे पाच मिनिटे युवकाला धुमसल्यानंतर पाच जणांनी त्याला जीपमध्ये जबरदस्तीने घातले व त्यातील तिघेजण जीपमधून तेथून निघून गेले. तर त्या दोन्ही महिला दुचाकीवरून जात असताना परिसरातील नागरिकांनी त्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या महिलांनी पोलिस असल्याचे सांगितले व तेथून निघून गेल्या.