Tue, Apr 23, 2019 10:03होमपेज › Satara › सातारा : बॉम्बची अफवा नव्हे; मॉकड्रिल (Video)

सातारा : बॉम्बची अफवा नव्हे; मॉकड्रिल (Video)

Published On: Mar 09 2018 2:17PM | Last Updated: Mar 09 2018 2:17PMसातारा : प्रतिनिधी

पोवई नाक्यावरील गजबजलेल्या मरीआई कॉम्प्लेक्स येथे बेवारस बॅग सापडल्यानंतर अवघ्या सातारकरांचा श्वास काही काळ रोखला. बॉम्बशोधक पथकासह श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळाची पाहणी करुन संशयास्पद बॅग ताब्यात घेतली असता त्यामध्ये कपडे असल्याचे समोर आले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनीच राबवलेले हे मॉकड्रिल असल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

सातारा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने सुरक्षेच्या कारणास्तव व आपत्कालीन वेळेत पोलिस दलातील विविध घटक किती जागृत आहे हे पाहण्यासाठी मॉकड्रिल राबवले. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मरीआई कॉम्प्लेक्स येथे बेवारस व संशयास्पद बॅग असल्याचा फोन पोलिसांना गेला. त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत बॉम्बशोधक पथक, श्वान पथक व पोलिसांचा फौजफाटा परिसरात पोहचला. मरीआई कॉम्प्लेक्सला पोलिसांनी वेढल्यानंतर वाहन चालकांसह परिसरात बघ्यांची गर्दी वाढली. 

बॉम्ब असलेली बॅग सापडली असल्याची अफवा तोपर्यंत पाहता पाहता सातार्‍यात व सोशल मिडियावर पसरली. यामुळे परिसरासह सातारकर बुचकळ्यात पडले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर परिसराची पाहणी केली. सुमारे पंधरा मिनिटात बॅगची पाहणी केल्यानंतर ती बॅग घेवून पोलिस तेथून निघून गेले. पोलिस निघून गेल्यानंतर मात्र तो मॉकड्रिल असल्याचे समोर आले. दरम्यान, यावेळी पोलिसांच्या तीन व्हॅन व सुमारे 20 पोलिस अधिकारी, कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.