Mon, May 20, 2019 20:05होमपेज › Satara › करवडीच्या पाटलांचे दिवस पालटणारी ‘चहाची टपरी’

करवडीच्या पाटलांचे दिवस पालटणारी ‘चहाची टपरी’

Published On: Mar 15 2018 5:47PM | Last Updated: Mar 15 2018 5:47PMकराड : सतीश मोरे

पहाटे साडेपाच वाजले असतील. गाढ झोपेत होतो. तेवढ्‌यात दादांचा फोन आला. ‘गावात पाऊस पडतोय, विहिरीजवळ सिमेंट उघडं पडलं असेल लवकर निघ अन् झाकून ठेव’ असं दादांनी सांगितलं. पटकन उठलो, बूलेट बाहेर काढली आणि जायला निघालो नाक्यावर पोहोचलो. खूप दिवसांतून इतक्या सकाळी बाहेर पडलो. पहाटे गार वारा वाहात होता. रस्त्यांवर अनेक जण व्यायामासाठी बाहेर पडले होते.  कृष्णा पूल ओलांडून मी गजानन सोसायटीमध्ये आलो.

पहाटे रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने मी वेगातच होतो.  रेल्वे पुलावर काही वृद्ध लोक व्यायाम करताना दिसले तर काही चालत येत होते. एका वृद्धाने काठीला रेडियम लावलेले होते. समोरून येणाऱ्या वाहनांचे लाईट पडल्यामुळे रेडियम चमकावे म्हणून त्या बाबांनी ती काळजी घेतली होती. आता ओगलेवाडी सोडून करवडी रस्त्याला लागलो. समोरून येणाऱ्या अनेक वाहनांना मागे टाकत मी करवडीत पोहचलो. पावणे सहाच्या दरम्यान मी रानात पोहचलो होतो. अजुनही अंधार होता.  किरकोळ पाऊस पडला होता.  बुलेट थेट विहिरीजवळ नेली लांबूनच पाहिले सिमेंटची पोती झाकलेली होती. गाडी परत वळवली कराड फलटण रस्त्यावर येऊन थांबलो. बाजूने जाणाऱ्या बैलगाडीमध्ये गाडी मालकीण मागच्या बाजूस झोपलेली दिसली. दमून भागून निजलेली ती ‘मालकीण’ पाहिली आणि मजूरांना कराव्या लागणाऱ्या कष्टांची जाणीव झाली. 

मजूरांचा विचार करतच करवडी स्टँडवर टपरीवजा चहाच्या गाड्यावर लाईट चालू होती, भक्तीसंगीताचा आवाज ऐकू आला. इतक्या सकाळी हॉटेल ते ही करवडीत उघड असेल याचा मी विचार केला नव्हता. गावचे शिवाजीराव आनंदराव पाटील यांचे हे हाँटेल आहे. इतक्या सकाळी मला पाहून शिवाजीरावांनी आज सकाळी सकाळी इकडे कुठे, असा सवाल केला.  लगेच किटली मधून चहा भरायला लागले. मी चहा पीत नसल्याचं सांगून गरम पाणी देण्याची विनंती केली. मग आमच्या गप्पा सुरू झाल्या इतक्या लवकर हाँटेल उघडता अशा सवालाला त्यांनी ‘अहो मी तीन वाजताच उघडतो’ असे हसत उत्तर दिले. हे ऐकूण मला आश्चर्यच वाटले. 

करवडी गावातील पाटलाच्या घरातला माणूस एसटी स्टॅण्डवर चहाची टपरी वजा हाँटेल काढतो आणि पहाटे तीन वाजता कामाला सुरुवात करतो याचं मला अप्रूप वाटलं. आमच्यातील पत्रकार जागा झाला चला आता यांची मुलाखत घेऊ असे म्हणून प्रश्नावली सुरू झाली. शिवाजीराव पाटील यांचं मध्यमवर्गीय कुटुंब. त्यांनी १० वर्षांपूर्वी कराड मंडईत भाजी विक्रीचा व्यवसाय केला. वाजता उठून भाजी मार्केट मधून भाजीपाला खरेदी करून शिवाजीराव पाटील सहा सात वाजता मंडईतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा शेजारी भाजीपाला विकायला बसायचे. १२ वाजता त्यांचा मुलगा गणेश त्यांच्या मदतीला यायचा. 

गणेशने भाजीपाला विकत वडिलांना हातभार लावलाच शिवाय एम.कॉमचे शिक्षणही पूर्ण केले. पुण्यामध्ये त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली. मात्र नोकरी सोडून त्याने गावाची वाट धरली. दरम्यान शिवाजीरावांनी  करवडीत चहाची टपरी सुरू केली होती. तो वडिलांना मदत करू लागला. चांगला जम बसला, चहाची टपरी चांगली चालू लागली लागली. रोज मोठी उलाढाल होऊ लागली. मिळालेले पैशांतील चांगली रक्कम बचत होऊ लागली. 

कराड फलटण रस्त्यावर खुप वाहतूक असते. चहा प्यायला पुसेसावळी पर्यंत एकही हाँटेल सुरू नसते. याचा अंदाज घेऊन शिवाजीराव पाटील यानी तीन वाजताच काम सुरू करतात. पहाटे 3 ते 9 दरम्यान शिवाजीराव टपरीवर काम करतात नऊ वाजता त्यांचा मुलगा मदतीला येतो. दिवसभर त्यांचा मुलगाच टपरी सांभांळतो. पाटील 15 ते 18 तास काम करतो आणि काम केले तर मुबलक पैसा मिळू शकतो याचा प्रत्यय मला शिवाजीरावांशी बोलताना आला.

नोकरीपेक्षा धंदा किती श्रेष्ठ आहे याचे मूर्तिमंत उदाहरण मला मला पाहायला मिळाले. शिवाजीरावांच्या मुलाने पुण्यात नोकरी केली असती तर आज त्याला चार आकडी  पगार मिळाला असताही मात्र त्याहून अधिक पैसे गावात राहून धंद्याच्या माध्यमातून त्याला मिळत आहेत. करवडीच्या शिवाजीराव पाटील यांना पाहून मराठी माणूसही उद्योग चांगला करू शकतो याचा मला अनुभव आला. मराठा समाजाने आरक्षणासाठी मोर्चा काढला होता त्या काळात मराठी माणसाने कोणताही उद्योग करावा असा एक सूर उमटला होता. शिवाजीराव पाटील यानी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली टपरी आता चांगली चालत आहे. 

शिवाजीराव पाटील यांच्या बोलण्यातून मिळालेली माहिती आणि त्यांच्या कुटुंबाचे कष्ट पाहून मराठी माणूस कुठेही कमी नाही याची जाणीव झाली. शिवाजीराव पाटील यांनी ती लाज न बाळगता मोठ्या धाडसाने कष्टाने आणि सातत्यपूर्वक काम केल्यामुळेच आज त्यांना चांगले दिवस पहायला मिळताहेत. पाटील यांच्याशी बोलून मी परत शेतात आलो. आता उजाडलं होतं. कष्टकरी व्यक्तीची भेट घेतल्याचे समाधान मला मिळाले होते.