Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Satara › ब्लॉग: माऊली पालखी सोहळा 'मॅनेजमेंट गुरु'

ब्लॉग: माऊली पालखी सोहळा 'मॅनेजमेंट गुरु'

Published On: Jul 05 2018 1:09PM | Last Updated: Jul 05 2018 1:17PMसतीश मोरे

पंढरीचा वारकरी। 
वारी चुकोनेदी हरी।।

पंढरीची वारी कशी सुरू होते.. कशी चालते, वारकऱ्यांना  कोण निमंत्रण पाठवतं? लाखो वारकऱ्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय कोण करतं? कसं चालतं हे सगळं..! कुणाची तक्रार नाही.. कोणाचा वाद नाही.. कोणी मोठा नाही.. कोणी लहान नाही. कोण कोणाला नाव विचारत नाही, जात विचारत नाही. सगळेजण फक्त एकाच ध्यासाने, एका दिशेने सलग अठरा दिवस ऊन, वारा, पाऊस याची कदर न करता कसे चालतात. त्यांना ही शक्ती कोठून मिळते? हे सगळंच एक न उलगडणारं कोडं आहे ! जगातील कोणत्याही देशात.. कोणत्याही धर्मात अशा प्रकाची सतत अठरा दिवस चालणारी धार्मिक यात्रा नाही. वारकरी हे कसं घडवून करतात? हा सर्व संशोधनाचा विषय आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आणि जगतगुरु तुकोबा महाराज पालखी सोहळा या दोन प्रमुख पालख्यांबरोबरच राज्यभरातील शंभरहून अधिक गावांतून येणाऱ्या  विविध  संतांच्या नावाच्या पालख्या आणि सुमारे पाच हजार गावांतून येणाऱ्या लहान-मोठ्या दिंड्या यांचे नियोजन हा अवघ्या जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. हे सर्व घडवून आणणारा वारकरी माऊली हा सर्वश्रेष्ठ "मॅनेजमेंट गुरु' आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी येथून तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू येथून सुरू होतो. या सोहळ्यात राज्यभरातून अनेक दिंड्या सहभागी होतात. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात रथापुढे २७ तर रथामागे सुमारे तीनशे नोंदणीकृत दिंड्या तसेच नोंदणी नसलेल्या सुमारे दोनशे दिंड्या आहेत. तुकोबा माऊली पालखी सोहळ्यात नोंदणीकृत ३२५ तर नोंदणी नसलेल्या शंभरहून अधिक दिंड्या आहेत. या दोन्ही सोहळ्यामध्ये सुमारे १ हजार दिंड्या असल्याची नोंद आहे. एका दिंडीमध्ये ५० ते एक हजार वारकरी असतात. यामध्ये  झेंडेकरी, वीणेकरी, टाळकरी, चोपदार, पाणी सेवा देणारे तसेच इतर सेवेकरी यांचा समावेश असतो. प्रस्थानाअगोदर दोन-तीन महिने दिंडी प्रमुखाच्या नेतृत्चाखाली तयारी सुरु होते. दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या संख्येनुसार राहण्याची सोय, तंबू, भोजन, वाहतूक याची तयारी केली जाते. सर्व संच एकत्र करून वारकऱ्यांना घेऊन वाहने आळंदी, देहुत पोहोचतात. प्रस्थानाच्या आदल्या दिवशी या दिंड्यांतील वारकरी आळंदी, देहुतील मठामध्ये किंवा खासगी जागेत कुठेही मुक्काम करतात. ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असतो. पुण्यनगरीत माऊली भक्तांच्या सेवेसाठी महानगरातील अनेक सेवाभावी संस्था, मंडळे कार्यरत असतात. पुण्यात वारकऱ्यांच्या निवासाची सोय शाळा, महाविद्यालये, धर्मशाळा येथे केली जाते. अनेक वारकरी मिळेल तेथे निवास करतात. अलिकडे पुणे, पिंपरी-चिंचवड येथील अनेक अपार्टमेंटस्‌च्या बेसमेंटमध्ये वारकऱ्यांच्या निवासाची सोय केली जाते. पुणे शहर सोडून या दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात आणि त्यानंतर येणाऱ्या सासवड आणि लोणी काळभोर येथील मुक्कामाच्या ठिकाणापासून खऱ्या अर्थाने  वारीचे अचूक मॅनेजमेंट पहायला मिळते. 

पालखी सोहळा सकाळी सातच्या सुमारास मार्गस्थ होतो आणि संध्याकाळी सहाच्या दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. साधारण ६ ते ८ किलोमीटर अंतर पार पडल्यानंतर पहिला विसावा घेतला जातो. पहिल्या विसाव्यानंतर पुढे तेवढेच अंतर पार पडल्यानंतर  दुपारी १२ च्या सुमारास जेवणासाठी सोहळा विसावतो. एक तासानंतर पुन्हा सोहळा मार्गस्थ होतो. सायंकाळी चारच्या सुमारास आणखी एका ठिकाणी विसावा घेतला जातो. त्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी सोहळा पोहोचतो.  वारकरी सकाळी ७ वाजता चालावयास सुरूवात करतात. "ज्ञानेश्वर माऊली तुकाराम', "राम कृष्ण हरी..' च्या जयघोषात भजनाच्या तालावर टाळ वाजवत वारकरी चालत असतात. प्रत्येक दिंडीच्या सुरुवातीला झेंडेकरी, त्या पाठोपाठ वीणेकरी. सोबत तुलशी वृंदावन आणि पाण्याचा हंडा घेतलेली महिला वारकरी अन्‌ त्यांच्या पाठोपाठ तीन किंवा चारच्या ओळीत टाळकरी आणि शेवटी चोपदार अशी प्रत्येक दिंडीतील व्यवस्था असते. शिस्तबद्ध सोहळ्यातील वारकरी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाहीत. एकदा चालावयास सुरूवात केल्यानंतर जोपर्यंत माऊलींचा रथ थांबत नाही तोपर्यंत कोणतीही दिंडीमध्ये थांबतच नाही. वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक गावात रस्त्याकडेला सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, मात्र माऊली सोहळ्यातील कोणताही वारकरी ओळ सोडून कधीही त्या सेवेचा लाभ घ्यायला जात नाहीत. दिंडीत कोणीही बाहेरचा व्यक्ती येऊ शकत नाही. चोपदार या सर्व गोष्टींवर लक्ष ठेऊन असतात.

एकीकडे सोहळ्यातील दिंड्या सकाळी मार्गक्रमण करतात. तर दुसरीकडे या दिंड्यांत सहभागी वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक हात झटत असतात. दिंडीत सहभागी वारकरी आणि सेवेकरी यांची लगबग पहाटे तीन वाजता सुरू होते. प्रात:विधी आणि अंघोळ आटोपून सोहळ्यात प्रत्यक्ष चालणारे वारकरी पहाटे चार वाजेपर्यंतच तयार होतात. या दरम्यान पालखी तळावर मुक्कामाच्या ठिकाणी उभारलेले सर्व तंबू काढले जातात. तंबुचे सर्व साहित्य तसेच वारकऱ्यांचे साहित्य, गाठोडी, पिशव्या ट्रक,जीप, टेम्पोमध्ये ठेवले जाते. ही वाहने चारच्या सुमारास पुढील मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ होतात. भोजन व्यवस्थेसाठी स्वतंत्र वाहन असते.  या वाहनात स्वयंपाकी तसेच सेवेकरी महिला आदी लोक बसतात. हे वाहन दुपारच्या नियोजित भोजन ठिकाणी मार्गस्थ होते. माऊलींच्या पालखी सोहळ्यात गेल्या अनेक वर्षांपासून ज्या दिंड्या सहभागी होत आहेत त्या सर्व दिंड्यांचे दुपारचे भोजनाचे ठिकाण अनेक वर्षांपासून एकच आहे. ठरलेल्या ठिकाणीच हे वाहन थांबते. हे वाहन सकाळी सातच्या सुमारास नियोजित ठिकाणी पोहोचते. त्यानंतर त्यामधील सेवेकरी नित्यक्रम आटोपून लगेच भोजन तयार करण्याच्या तयारीस लागतात. या ठिकाणी कोणत्या दिवशी कोणता स्वयंपाक करायचा याचेही नियोजन ठरलेले असते. अनेक दिंड्यांमध्ये तर भोजनाचा मेनूही वर्षानुवर्षे एकच आहे. (कराडकर १२ नंबर दिंडीच्या लोणंद मुक्कामी दुपारच्या जेवणात गुलाबजामून असतेच. तर तोंडले-बोंडले येथे दुपारच्या जेवणात वारकरी गेल्या अनेक वर्षांपासून चकुल्यांचा स्वाद घेतात.) दुपारी १२ वाजता दिंडीत चालणारे वारकरी ठरलेल्या ठिकाणी येतात. या वारकऱ्यांची पहिली पंगत होते. त्यानंतर इतर वारकरी, सेवेकरी मोकळ्या समाजातून चालणारे वारकरी यांची दुसरी पंगत होते. भोजनानंतर वारकरी थोडावेळ विसावा घेतात. नगारा वाजल्यानंतर लगेच पालखीच्या पुढे किंवा मागे नेमून दिलेल्या जागेवर आपल्या दिंडीमध्ये जातात. दुपारच्या भोजनाची व्यवस्था झाल्यानंतर भोजन वाहतुकीचे वाहन मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचते. थोडावेळ आराम केल्यानंतर पुन्हा पाच वाजता संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू होते. भोजन व्यवस्थेमध्ये (दिंडीतील वारकरी संख्येनुसार) १० ते २० जण कार्यरत असतात. अनेक पंगतींसाठी दानशूर लोकांनी धान्य, तेल, साखर आदी वस्तूरुपात मदत दिलेली असते. दिंडीत कितीही लोक आले तरी कोणालाही अन्न कमी पडत नाही. वारकऱ्यांच्या निवासासाठी प्रत्येक दिंडी मालकाने तंबुची सोय केलेली असते. तंबुचे सर्व साहित्य, लोखंडी ऍंगल, ताडपत्री, मेका यांचे (राहुटी) नियोजन प्रत्येक दिंडी मालकाने अनेक वर्षांपासून करून ठेवलेले आहे. 

एका तंबुमध्ये २० ते ३० वारकरी राहू शकतात. त्यानुसार प्रत्येक दिंडीत १५ ते ५० इतके तंबू  (राहुट्या) असतात. हे सर्व साहित्य घेऊन वाहन मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचते. प्रत्येक गावातील माऊलींच्या पालखीचे मुक्कामाचे ठिकाण गेल्या अनेक वर्षांपासून निश्चित आहे. निश्चित जागेवरच पालखीतळ उभारला जातो. पालखीतळापासून प्रत्येक दिंडीचा मुक्काम कोणत्या ठिकाणी असावा, ती जागा सुद्धा अनेक वर्षांपासून एकच आहे. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांना या जागा ओळखीच्या झाल्या आहेत. कमी जागेत अनेक दिंड्या आपले तंबू उभारतात. या तंबुंची दिशा, जागा हे सुद्धा निश्चित आहे. साहित्य घेऊन आलेला ट्रक मध्यभागी एका विशिष्ट ठिकाणी उभा केला जातो. या ट्रकच्या एका बाजूला भोजन तयार करण्यासाठी ताडपत्री सोडून जागा तयार केली जाते. ही ताडपत्री त्या ट्रकला बांधलेली असते. ताडपत्रीच्या दोऱ्या ताणून बांबुला बांधून तेथे भोजनाचे साहित्य ठेवले जाते. भोजन कक्ष (किचन) तयार झाल्यानंतर  सेवेकरी तंबू उभारण्याच्या कामाला लागतात. दुपारी १२-१ पर्यंत पालखी तळावर अनेक दिंड्यांचे तंबू तयार झालेले असतात. 

सायंकाळी सातच्या सुमारास सोहळ्यातील वारकरी आपल्या ठरवून दिलेल्या तंबुमध्ये मुक्कामाला जातात. संध्याकाळी ७ ते पहाटे ३ पर्यंत या वारकऱ्यांसाठी हेच घर असते. पहाटे तीन वाजता सर्व तंबू पुन्हा काढले जातात. साहित्य ट्रकात भरले जाते आणि ही वाहने पुढच्या मुक्कामाला पोहोचतात. 

गेली अनेक वर्षे माऊली पालखी सोहळा सुरु आहे. सर्व नियोजन अखंडपणे सुरु आहे. कोणी आला किंवा आला नाही म्हणून दिंडी सोहळा कधीच थांबलेला नाही. हा सोहळा अविरत सुरु राहण्यासाठी अनेकांचे हात लागलेले आहेत. कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही, निमंत्रण नाही, सांगावा नाही. प्रलोभन नाही, फी नाही, कसलाही बंदोबस्त नाही. निधी मिळण्यासाठी कोणाकडे हात पसरायला जावे लागत नाही. तरीही हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडत असतो. हे सर्व कोठून येते, कोण करते हे माऊलींच्या विश्वासावर टाकले जाते. सुमारे चार लाख लोक रोज या गावाहून त्या गावाकडे चालत राहतात. पुढच्या गावात मुक्काम करतात. तिथे मांडलेला संसार मोडून पुन्हा पुढच्या ठिकाणी मार्गस्थ होतात. कोणालाही काहीच कमी पडत नाही. कोणीच उपाशी रहात नाही. कोणीच आजारी पडत नाही. कसलीही अडचण आली तरी मदतीसाठी अनेक हात धावून येतात. रहायला, झोपायला , खायला कसलीच अडचण येत नाही. निशि्ंचत होऊन पुढे चालत रहायचे. माऊलींनी सगळी सोय केलेली असते. स्वर्गलोकात सुद्धा असा सोहळा पहायला मिळत नाही. असा सोहळा पाहण्यासाठी देवांनासुद्धा पृथ्वीतलावरच यावे लागले आहे, अशी वारकरी समाजाची धारणा आहे. माऊली पालखी सोहळ्याविषयी कितीही लिहीले तरी कागद अपुराच पडणार आहे. असा हा सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी जगभरातून अनेक लोक वारीत सहभागी होत आहेत. मॅनेजमेंट गुरु माऊली पालखी सोहळा हे जगासाठी नेहमीच संशोधनाचा विषय राहिला आहे.

या सुखाकारणे देव वेडावला ।
वैकुंठ सोडोनू वारीसी आला ।।