Sun, Apr 21, 2019 05:53होमपेज › Satara › ब्लॉग : सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा

ब्लॉग : सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा

Published On: Jul 09 2018 4:20PM | Last Updated: Jul 10 2018 1:04AMसतीश मोरे

विठ्ठल विस्तारला जनी
सप्तही पाताळे भरोनी
विठ्ठल व्यापक त्रिभुवनी
विठ्ठल मुनी मानसी
विठ्ठल जीवाचा जिव्हाळा
विठ्ठल कृपेचा कोवळा
विठ्ठल प्रेमाचा पुतळा
लावियेला चाळा विश्वविठ्ठले
विठ्ठल बाप माय चुलता
विठ्ठल भगिनी आणि भ्राता
विठ्ठलेवीण चाड नाही गोता
तुका म्हणे आता नाही दुसरे

वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल आणि या देवाजवळ जाण्याचा सहज सोपा मार्ग दाखविणारे संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या नावात किती ताकद आहे, याचा प्रत्यय आज वारकऱ्यांनी पुन्हा एकदा अनुभवला. दिवे घाटातील चढ उतार, वेडीवाकडी वळणे कधी आली आणि संपली माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी माऊलींना कळलेच नाही. सहा वर्षांच्या बालकापासून सत्तर ऐंशी वर्षाच्या म्हातारा म्हातारीला वारीत चालण्याची ताकद दिली फक्त नामाने.

पंढरीची वारी करावी अशी मराठी मातीतील प्रत्येकाची इच्छा असते.  पण सर्वांनाच वारीला जायला जमत नाही. विठ्ठलाप्रती भक्ती आणि ओढ ज्याच्या हृदयात उफाळून येते. संत संगतीचा ध्यास ज्याला झोपू देत नाही आणि या गोष्टी जुळल्यानंतर ज्याला विठ्ठलाचे बोलावणे येते त्यालाच पंढरीच्या वारीचे भाग्य लाभते. 

स्वतःच्या इच्छेने किंवा लेकाने सुनेने बळजबरीने वारीला पाठविलेले वृद्ध दांपत्य, संसारातील कटकटीला कंटाळलेला कुणाचा पती, कुणाची पत्नी, सासू सासरे सुन, जावई, भाऊ आणि बहीण, तरूण,  तरूणी, म्हातारी, म्हातारा, लहान मुले, मुली सारे जण पंढरीच्या वारीला आले आहेत. इच्छेने असो की, अनिच्छेने वारीला जाण्यासाठी माऊलींच्या पालखी सोहळ्यात दिंडीत तो कष्टकरी भाविक सहभागी झाला आहे. खिशात एक रुपया नसतानाही माऊली कृपेने कसा काय आळंदीला पोचलो असे म्हणणारे लोक पण भेटले. या शेजारणीनं बरं नाही केलं मला पंढरीला नेलं ग बया म्हणणारी  शेजारणीने ओढून वारीला आणलेली खडूस शेजारीण पण आहे तर कुणी बायकोबरोबर भांडण झालं म्हणून वारीला आला आहे.

वारीत सर्व प्रकारचे लोक आहेत. केवळ पंधरा दिवस काही काम नाही, टेन्शन नाही, मजा करायला मिळते म्हणून आलेले पण लोक आहेत तर वडिलांना म्हातारपणामूळे जमत नाही म्हणून पहिल्यांदाच आलेला पुत्र पण आहे. काही कारण असो किंवा विनाकारण असो माऊलींच्या पालखी सोहळ्यातून पंढरीला निघालेला हा वारकरी आनंद लुटत आहे. काशी यात्रा आणि ही वारी यात फरक आहे. इतर सर्व यात्रा पापक्षालन आणि पुण्यसंपादनासाठी एकवार केल्या जातात. मात्र आळंदी पंढरीची वारी नित्यनेमाने प्रतिवर्षी करायची असते. 

भक्तीप्रेमरसाची अनुभुती घेण्यासाठी आलेला या वारकऱ्याने आळंदीतून चालायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी जोश होता. संताची साथ आणि जवळच्या लोकांची सोबत होती. २५-३० किमी अंतर चालून वारकरी पुण्यनगरीत मुक्कामाला आले. दोन दिवस पुणेकराच्या आदर अतिथ्याने माऊली भारावले. पुण्यभूमीला नमस्कार करून वैष्णवांचा मेळा सासवडकडे निघाला. पंढरीच्या वारीमध्ये सर्वात अवघड आणि लांब असा हा टप्पा. त्यात भर म्हणजे दिघीचा घाट. आणखी मोठी भर  एकादशी. सहा वाजता पालखी निघाली. शिंदे छत्री येथे सकाळचा विसावा, हडपसर येथे दुपारचे भोजन करून विठ्ठल नामाचा जयघोष करीत पालखी दिघी घाटात पोहचली. चढाचा रस्ता सुरू झाला आणि वैष्णवाचा जोश वाढू लागला. अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी झुगारीत अवघ्याले आली पंढरीची वारी
आता तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष आणखी जोमाने सुरू झाला. हळूहळू पालखी आणखी चढाला लागली. आभाळ भरून आले होत मात्र पाऊस पडत नव्हता. गदमदू लागलं पण माऊलींच्या ताकदीपुढे सर्व किरकोळ होतं. वैष्णवांनी आता राधा राधा राधा कृष्ण राधाचा ठेका धरत नाचायला सुरवात केली. दुसरीकडे काहींनी जय जय राम कृष्ण हरीचा नाद धरला. अंतर कमी होत होतं. वैष्णव जन नाचत होते. पालखीला जोडलेले बैल जोमाने चालू लागले. विठ्ठल भेटीसाठी आसुसलेल्या वैष्णवाचा नामाचा गजर कानावर पडल्यामुळे त्यानाही जणू स्फुरण चढले होते. पालखी पुढे पुढे जात होती. भजनात दंग होऊन नाचणाऱ्या वैष्णवाना पायाखालची वाट कशी निघून गेली हे कळलेच नाही. सर्व इंद्रिये भजनरंगात रंगल्याने अदभूत शक्ती मिळून वृद्धाच्या ठिकाणीसुध्दा तरूणासारखा आवेश व उत्साह निर्माण झाला आणि घाटातील अवघड वाटेच्या रूपातील दु:ख संपून गेलं. माऊलीच्या पालखी सोहळ्यात रस्ता कधी संपतो हे लक्षातच येत नाही याचा प्रत्यय आणि प्रत्यक्ष अनुभव वैष्णवाच्या संगतीत आला.

गायनाचे रंगी
शक्ती अदभूत हे अंगी
हे तो देणे तुमचे देवा
घ्यावी अखंडित सेवा
अंगी प्रेमाचे भरते
नेघे उतार चढते
तुका म्हणे वाणी
प्रेम अमृताची खाणी.

म्हणून वारकरी बेफाम नाचतो..

वारीमध्ये तसेच कीर्तन, अभंग म्हणताना वारकरी का नाचतात याबाबत एक मजेशीर प्रसंग सांगितला जातो. एकाने दुसऱ्याला विचारले हे लोक का नाचतात? दुसरा सद्पुरूषाने हसत हसत उत्तर दिले, अरे बाबा मनुष्याच्या डोक्यावर मोठे थोरले ओझं दिलं तो नाचणार नाही. कुंथतच राहील. पण ते ओझे कुणी काढून टाकले तर तो उड्या मारत नाचेल. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर दोन मोठ्ठी ओझ्याची गाठोडी असतात. एक प्रपंचाचे दुसरे परमार्थाच. या दोन्हीच्या भाराखाली मनुष्य दबलेला असतो. पंढरीच्या वारीमध्ये अशी मौज आहे की, पाठीमागे असणाऱ्या ज्ञानोबा माऊलींनी त्याच्या डोक्यावरून परमार्थाच ओझं काढून घेतले आहे तर पुढे असलेल्या पाडुरंगाने प्रपंचाचे औझे पळवले आहे. त्यामुळे तो या वारीत बेफाम होऊन नाचत आहे आणि त्यामुळेच घाट रूपी दु:ख कसे संपले हे त्याला समजत नाही.