Tue, Jun 18, 2019 20:20होमपेज › Satara › तुम्ही भाजपचे 3 आमदार निवडून आणण्याची सुपारी घेतली काय? 

तुम्ही भाजपचे 3 आमदार निवडून आणण्याची सुपारी घेतली काय? 

Published On: Jun 07 2018 2:09AM | Last Updated: Jun 07 2018 12:01AMसातारा : प्रतिनिधी

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांच्या कराडात आ. जयकुमार गोरे यांनी टीका केल्यानंतर जिल्हा काँग्रेसने पत्रक काढून आ. जयकुमार गोरे यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदाराने भाजपचे तीन आमदार निवडून आणण्याची सुपारी घेतली आहे काय? असा सवाल जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, कार्याध्यक्ष अ‍ॅड. विजयराव कणसे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. धनश्री महाडिक यांनी केला आहे. वाद-प्रत्यारोपामुळे जिल्हा काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा उफाळला असून तो आता एकेरीवर आला आहे. 

आ. आनंदराव पाटील, अ‍ॅड. विजयराव कणसे, सौ. धनश्री महाडिक यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपचे तीन आमदार निवडून येतील, असे म्हणणे म्हणजे दबावाचे राजकारण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रकार आहे. आघाडी धर्मानुसार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी राजकारणाचे संकेत पाळावेत, असे जर आपणास वाटत असेल तर स्वत:च्या पक्षातील 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये खटाव व कोरेगाव तालुक्यात आपण काय भूमिका घेतली होती? याचे आत्मपरिक्षण करा. आपणास फार मोठा जनाधार आहे. तुमची डीएनए चाचणी केली तर काय बाहेर पडेल? खरे काय आणि खोटे काय? माण-खटाव  पंचायत समितीत काय  झाले? आपण पक्षाशी किती प्रामाणिक आहात?  सातत्याने पत्रकार परिषदा घेवून स्टंटबाजी करण्याची आपली जुनी स्टाईल आहे. काँग्रेस पक्ष व  पृथ्वीराज चव्हाण आपल्या पाठीशी नसतील तर आपले काय होईल, याचे भान असावे. हिंमत असेल तर अपक्ष रहा, असा सल्लाही या तिघांनी दिला आहे. 

गत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राज्यातील नेत्यांवर दबाव टाकून कोरेगाव, खटाव, माण तालुक्यामध्ये मी म्हणतो त्यालाच तिकिट दिले पाहिजे, अन्यथा सर्व मतदार संघात काँग्रेस पक्षाचे चिन्ह न घेता निवडणुका लढवेन असा दबाव टाकून आपल्या मर्जीतल्या समर्थक उमेदवारांना जिल्हा परिषदेची तिकिटे देण्याचा हट्ट धरून तुम्ही वेगळी चूल मांडली आणि कोरेगाव पंचायत समिती ताब्यात असताना  घालवली. 16 मतदार संघात आपण फक्‍त तीनच उमेदवार निवडून आणले, हा आपला मोठा जनाधार, असा टोलाही या तिघांनी हाणला आहे. काँग्रेसमध्ये असलेले जि.प. सदस्य रणजित देशमुख यांचा मतदार संघ राखीव झाल्यानंतर त्यांच्या पत्नीस उमेदवारी द्यावी, असा आग्रह कै. पतंगराव कदम, बंटी पाटील व डॉ. विश्‍वजीत कदम यांनी धरला. मात्र, आपण त्यांचा शब्द पाळला नाही. याचेही उत्तर कधी तरी द्यावे लागेल. काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या कार्यप्रणालीबाबत सातत्याने आरोप-प्रत्यारोप करायचे आणि पक्ष संघटनेत दुफळी माजवायची हा एकमेव उद्योग सुरू आहे. 2009च्या विधानसभा निवडणुकीला आघाडी असतानाही सातारा, कराड, कोरेगाव, वाई, फलटण तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी माण तालुक्यात येवून रात्रीचा दिवस करून तुम्हाला आमदार केले याची जाण व परतफेड आपण कशी करत आहात? असा सवालही विचारण्यात आला आहे. 

तुमच्या हेकेखोरपणामुळेच सुरेंद्र गुदगे, रणजित देशमुख, अनिल देसाई असे सकस व ताकदवान कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडले. शंकरराव जगताप यांच्यासमवेत झालेल्या बैठकीस सुरेंद्र गुदगे यांच्या पत्नीस पक्षप्रतोद करण्याचा निर्णय झाला. मात्र, दुसर्‍याच दिवशीच तुम्ही त्याला विरोध केला व त्यांना पक्षप्रतोद पद मिळवून दिले नाही.  जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्याजवळ 400 सभासद नोंदणी पुस्तके दिली. प्रदेश अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्यासमोर तुम्ही खोटे बोलला. तुम्ही सभासद केले नाहीत याची जबाबदारी कोणाची? त्यामुळे तुम्ही प्रदेश प्रतिनिधी झाला नाही याचे खापर जिल्हाध्यक्षांवर कशाला ठेवतो? असा एकेरी सवालही या तिघांनी केला आहे. 

जातीयवादी पक्ष असलेल्या भाजपला हद्दपार करण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. मात्र, तुम्ही स्वपक्षातील नेत्यांवर बेताल आरोप व निरर्थक बदनामी  करणे थांबवले तर तुमच्यासाठी  भले होईल. पृथ्वीराज चव्हाण, आनंदराव पाटील यांनी सभा घेतली व तुम्ही निवडून आला. तुमचे बंधू अंकुश गोरे यांच्यामुळे तुम्ही राजकारणात प्रवेश केला त्याचे भान तुम्हाला राहिलेले नाही. आधी तुमच्या कुटुंबाशी कसे वागायचे ते ठरवा. काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक राहिला तरच तुमचे भविष्य चांगले राहिल. तुमच्या बंधूचे व आनंदराव पाटील यांचे कौटुंबिक संबंध असल्यामुळेच तुमची राजकीय कारकिर्द सुरू राहिली याचा विसर तुम्हाला पडलेला दिसतो. उपकार करणार्‍यावर पायउतार करणे ही सवय बदला. काँग्रेस पक्ष व   पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी प्रामाणिक रहा, असा सल्लाही पत्रकात देण्यात आला आहे.