दहिवडी : प्रतिनिधी
बिजवडी (ता. माण) येथील मधुयोग मंगल कार्यालयासमोर विवाह पार पडल्यानंतर फटाके वाजवण्यात आले. त्यावेळी माळरानातील गवताने पेट घेतल्याने वर्हाडी मंडळींच्या दोन गाड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने सर्वजण मंगल कार्यालयात असल्याने जीवितहानी टळली. याबाबतची माहिती अशी, बिजवडी येथील मधुयोग मंगल कार्यालयात विवाह सोहळा होता. सोहळ्याला तोंडले (डांगेवाडी) ता. माण व कोरेगाव येथील वर्हाड आले होते. मंगल कार्यालयासमोरीस मोकळ्या पटांगणावर सर्व वाहने पार्किंग केली होती. विवाह सोहळा पार पडताच कार्यालयाच्या गेटवर फटाके वाजवण्यात आले. त्याच्या ठिणग्या माळरानातील वाळलेल्या गवतावर पडल्या.
यामुळे गवताने पेट घेतला. वार्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. ही आग पार्किंग केलेल्या वाहनांपर्यंत गेली. यामुळे कळस्करवाडी, ता. माण येथील शंकर भिकू पवार यांची दोन महिन्यांपूर्वी घेतलेली मारूती ओमनी ( एमएच 11 सीजी 4795) व उरळी कांचन ता.हवेली, जि पुणे येथील संजय हरिभाऊ डांगे यांची मारूती आल्टो (एमएच 12 जेझेड 8028) ही वाहने जळून खाक झाली. यात 7 लाखांचे नुकसान झाले आहे. तथापि, गाडीतील महत्त्वाची कागदपत्रे व रक्कम प्रसंगावधान राखून बाहेर काढण्यात यश मिळाले.
दोन्हीही गाड्यांना गॅसकिट होती मात्र सुदैवाने स्फोट झाला नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान, मंगल कार्यालयातील पिण्याच्या पाण्याच्या टँकरने व पाणी पिण्यासाठी आणलेले कॅनच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न काही युवकांनी केला. तसेच इतर गाड्याही तेथून सुरक्षित ठिकाणी हलवल्या. घटनेचा पंचनामा दहिवडी पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सपोनि प्रवीण पाटील करत आहेत.